घरमुंबईभगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मुहूर्त सापडला!

भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मुहूर्त सापडला!

Subscribe

५९२ कोटी खर्च करणार , महिन्याभरात कामाला सुरुवात

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाला अखेर मुहूर्त सापडला. रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तब्बल ५९२ कोटी रुपये खर्च करून रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. समितीच्या मंजुरीनंतर या महिन्यातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

बोरीवली पश्चिम येथील एक्सर व्हिलेज येथील भगवती रुग्णालयाच्या आवारातील इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच मंडपेश्वर येथे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची घोषणा मागील अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु रखडलेल्या या रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या कामातील अडथळे दूर झालेले आहेत. रुग्णालयाच्या इमारतीसाठी संरचनात्मक आराखडे बनवण्यासाठी महापालिकेच्यावतीने शशी प्रभू अ‍ॅण्ड असोशिएट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बनवलेल्या आराखड्यांना महापालिकेच्या वास्तूशास्त्र विभागाने मान्यता दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.

- Advertisement -

तळघर अधिक तळमजला तसेच सर्व्हिस मजल्यासह आठ मजल्यांच्या या इमारतीत एकूण ४९० खाटांचे रुग्णालय असणार आहे. येथील २ मुख्य जुन्या रुग्णालयीन इमारती विभाग कार्यालयाच्या वतीने तोडण्यात आल्या आहेत.तसेच जुन्या कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती व नर्सिंग कर्मचारी वसाहतीची इमारत पाडून त्या जागेवर या रुग्णालयाची उभारणी होणार आहे.

वातानुकूलन यंत्रणा, अग्निरोधक यंत्रणा, मेडिकल गॅस सिस्टीम, मॉड्युलर ओ.टी. प्रणाली, न्युमॅटीक ट्रान्सपोट आदी सुविधा सल्लागारामार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याआधारे बनवण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार मागवलेल्या निविदेमध्ये कपॅसिटे इन्फ्राप्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली आहे. या निविदा स्पर्धेत अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट आणि उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम या कंपन्या होत्या. परंतु आठ टक्के अधिक बोली लावून कपॅसिटे इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने हे काम मिळवले आहे. विविध प्रकारच्या करांसहित ५९२ कोटी रुपयांत कंत्राट देण्यात आले आहे.

- Advertisement -

भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. त्यामुळे सर्व बाबी पडताळून या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, निश्चितच उत्तर मुंबईतील नागरिकांसह आसपासच्या भागातील नागरिकांसाठी अत्याधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे सुसज्ज असे रुग्णालय उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवसेना पक्षाने निवडणुकीत वचननाम्यात जी जी वचने दिली आहेत, ती ती निश्चितच पूर्ण केली जात आहेत, त्याचाच हा भाग आहे. त्यामुळे मुंबईकरांना भगवती रुग्णालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाईल,असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -