भाईयो और बहनों उध्दव ठाकरेंचे अयोध्येत होणार कडक हिंदीत भाषण

Mumbai
Ayodhya rammandir

अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी शिवसेनेतील हिंदी लॉबी कामाला लागली आहे. उध्दव ठाकरे यांचे भाषण अस्खलित हिंदीतून व्हावे, या भाषणाद्वारे हिंदी भाषिकांना आपलेसे करावे, त्यांची सेनेशी जवळीक वाढवावी, याची तयारी या दौर्‍यात हिंदी भाषिक शिवसैनिकांनी केली आहे. या निमित्ताने प्रथमच उत्तर प्रदेशात शिवसेनेची पताका फडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

राम मंदिर उभारणीच्या कामात पुढाकार घेण्याच्या उध्दव ठाकरे यांच्या घोषणेने अयोध्येचे वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. उध्दव यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर अयोध्येत फटाके वाजवून तिथल्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. २४ आणि २५ नोव्हेंबरला उध्दव अयोध्येत असतील. २५ नोव्हेंबरला उध्दव यांची जाहीर सभा अयोध्येत होणार आहे. या सभेतील भाषणाच्या मुद्यांची तयारी करण्यात येत आहे. राम मंदिर उभारण्याचा अयोध्येतील लोकांचा कल जाणून घेण्यात येणार आहे. हे काम शिवसेनेच्या हिंदी लॉबीतील जबाबदार पत्रकार करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मिशन अयोध्या’ कार्यक्रमाच्या निश्चितीनंतर ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीच्या पतनानंतर ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे, अशी थेट भूमिका घेतली होती. त्या बाळासाहेबांचा मुलगा नेमके काय बोलणार आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.अयोध्येतील लोकांबरोबरच देशभरच्या जनतेतही याबद्दल कुतुहल आहे. त्यातच या मुद्यावर बॅकफुटवर गेलेल्या भाजप आणि संघाचीही बारीक नजर आहे. विशेष म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या भाषणाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेच्या ‘दोपहर का सामना’ या हिंदी दैनिकाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या दैनिकाने अयोध्येतील मंदिर उभारणीच्या सुरू झालेल्या आंदोलनापासून विद्यमान स्थितीचा अहवालच पटलावर ठेवला आहे. यातूनच उध्दव यांच्या भाषणाचे मुद्दे काढले जात असल्याचे खात्रीलायकरित्या सांगण्यात आले. उध्दव यांचे भाषण सुमारे एका तासाचे असेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. उध्दव यांचे हिंदी अस्खलित नाही. भाषण त्या तोडीचे व्हावे म्हणून काही पत्रकार उध्दव ठाकरे यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्याभूमी ही वादग्रस्त असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. यामुळे भाषण करताना न्यायालयाचा अवमान होईल, असे मुद्दे उध्दव ठाकरेंना घेता येणार नाहीत. मात्र मंदिर उभारणीसाठी आजवर देण्यात आलेल्या आश्वासनांची कशी वासलात लागली, यावर ते मुद्देसूद बोलू शकतील असे जाणकार सांगतात.

उध्दव यांच्या भाषणाबद्दल प्रचंड उत्सुकता अयोध्या भूमीतील जनतेत आहे. भाषण कसे असेल याकडे राजकीय विश्लेषक लक्ष ठेवून आहेत. पण हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षावर उध्दव ठाकरेंकडून शरसंधान केले जाऊ शकते. राम मंदिर उभारणीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने गेल्या साडेचार वर्षात मंदिराची एक वीटही रचली नाही, याकडे उध्दव यांच्या भाषणाचा रोख असेल. याद्वारे हा पक्ष केवळ मंदिराचे राजकारण करत आल्याचा ठपका उध्दव ठेवतील, असे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांची संभाव्य टीका पाच राज्यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला चांगलीच अडचण निर्माण करणारी होऊ शकते, हे उघड आहे. यामुळेच भाजप ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याची माहिती घेत आहे.

‘मेरे तमाम हिंदू भाइयों, माँ और बहनों,’ अशा गरजणार्‍या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात उध्दव ठाकरे करतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी भाषणाच्या सुरुवातीची आवृत्ती उध्दव ठाकरे यांच्या हिंदी भाषणात असेल. आपल्या अयोध्येतील भेटीचे कारण सांगताना केंद्रातल्या सरकारवर उध्दव टीकेची झोड उठवतील. ज्या मंदिराच्या नावाने मोदींनी एनडीएसाठी मते घेतली त्या एनडीएची ‘डीएनए’ चाचणी करण्याची वेळ आल्याचे ते केंद्र सरकारला भाषणात बजावतील. भाजप सरकारला घेरण्याची तयारी उध्दव यांच्या हिंदीतील भाषणातून केली जात आहे.

एकीकडे केंद्रातल्या सत्तेला जबाबदारीची जाणीव करून देताना दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या नामकरणावरही उध्दव कोरडे ओढतील, असे सांगण्यात आले. पुतळे उभारा किंवा शहरांचे नामकरण करा, पण राम मंदिरासाठी तुम्ही कायदाही करू शकत नाही आणि ते उभारू शकणार नाहीत, अशी घणाघाती टीका ते योगी सरकारवर करतील, असे सांगण्यात आले. बाळासाहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांचा मुलगा तुम्हाला विश्वास देण्यासाठी आला आहे, अशी हाक ते उपस्थितांना देतील.

विटाही पाठवणार

उध्दव यांच्या या अयोध्या दौर्‍यात ‘जय श्रीराम’ असे शब्द लिहिलेल्या विटा माजी उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे हे उध्दव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन त्यांच्या स्वाधीन करतील. या विटा उध्दव अयोध्येत आपल्यासोबत घेऊन जातील. त्या राम मंदिर विश्वस्तांना सुपूर्द केल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणामुळे त्यांचा वापर लागलीच केला जाणार नाही.

परवानगीसाठी चार आयुक्तांची बैठक

अयोध्येतील रामजन्मभूमी वादग्रस्त असल्याने तिच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण आहे. या क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांबरोबरच, नगरनिगमचे आयुक्त, स्थानिक पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या विशेष बैठकीत निर्णय घेतला जातो. उध्दव ठाकरेंच्या दौर्‍याला परवानगी देण्यासाठी चार आयुक्तांची विशेष बैठक लवकरच बोलावली जाणार आहे.

जुलैपासूनच अयोध्या दौर्‍याची तयारी

उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची तयारी जुलै महिन्यापासूनच सुरू झाली. दौर्‍याची रुपरेषा स्पष्ट झाल्यावर उध्दव यांनी दौर्‍याची अधिकृत घोषणा शिवाजी पार्क येथील दसर्‍या मेळाव्यात केली. जुलै महिन्यात यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांकडे पहिला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रशासनाने हा प्रस्ताव नगरनिगम, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्याचे शिवसेनेला कळवले. त्यानंतर शिवसेनेने दौर्‍याच्या हालचालींना सुरुवात केली.

पक्षप्रमुखांच्या दौर्‍याची तयारी पूर्ण

उध्दव ठाकरे यांच्या अयोध्येतील दौर्‍याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. २५ नोव्हेंबरला होणार्‍या जाहीर सभेतील भाषणाची तयारीही होत आली आहे. अयोध्येतील लोकांना राम मंदिर उभारणीचा विश्वास देणे हे उध्दव-साहेबांच्या दौर्‍याचे पहिले उद्दिष्ट आहे. राम मंदिरच्या नावाने मते मिळवून या मुद्याची भाजपने धरसोड केल्याबद्दल पक्षप्रमुख आपल्या भाषणात उहापोह करतील. साहेबांचे भाषण पूर्णपणे हिंदीत होईल. मराठीप्रमाणे त्यांचे या भाषेवरही प्रभुत्व आहे. – खासदार विनायक राऊत, सचिव, शिवसेना.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here