Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्यावर आज खेडमध्ये अंत्यसंस्कार

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्यावर आज खेडमध्ये अंत्यसंस्कार

मंगळवारी सकाळी चेंबूर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. नंतर सायंकाळी त्यांच्यावर खेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड दशकापासून भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभळणारे शिवसेना उपनेते माजी आमदार कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचे सोमवारी रात्री चेंबूर येथील झेन रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते.  महाडिक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी चेंबूर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. नंतर सायंकाळी त्यांच्यावर खेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रिझर्व्ह बॅंकेत कर्मचारी पदापासून कारकिर्दीला सुरुवात करणारे सूर्यकांत महाडिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीपुत्रांबाबतच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेच्या मराठीच्या लढ्याकडे ओढले गेले. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कामगार क्षेत्रात आलेले सूर्यकांत महाडिक सेनेच्या तिकिटावर नेहरूनगर विधानसभेवर दोनदा निवडून आले. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष रमाकांत मोरे आणि सचिव कृष्णकांत कोंडलेकर पायउतार झाल्यावर अध्यक्ष म्हणून सूर्यकांत महाडिक यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या जोडीला किरण पावसकर यांनी सचिव म्हणून केलेल्या कामगिरीमुळे २००५ साली सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांना कामगार क्षेत्रात विशेष शिरकाव करता आला नाही. साहजिकच त्यामुळे शिवसेनेत महाडिक यांचं वजन वाढले.

- Advertisement -

चेंबूर परिसरात राहणारे सूर्यकांत महाडिक हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक समजले जात. कामगार विषयक कायद्याचं ज्ञान आणि ते कामगार सभांमधून कामगारांच्या गळी उतरवणे ही महाडिक यांची विशेष हातोटी होती. मधुमेहामुळे दिर्घकाळ आजारी असलेल्या महाडिक यांची तब्येत दिवाळी पूर्वी खूपच बिघडली होती. मात्र हिंदूजा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सूर्यकांत महाडिक यांना दिवाळीच्या आदल्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. कामगार आणि शिवसैनिकां मध्ये बापू म्हणून परिचित असलेल्या महाडिक यांनी घरातूनच कामालाही सुरुवात केली होती. मात्र त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला तेव्हा त्यांना चेंबूरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले. उपनेते असलेल्या महाडिक यांची शिवसेना नेता होणे आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊन विधानसभेत पोहचणे ही अनिवार इच्छा होती.

- Advertisement -