राज ठाकरे, ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर!

ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिरावरून दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंवर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

Mumbai
Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi
प्रकाश आंबेडकर यांची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी असल्या, तरी त्यासाठीचं वातावरण मात्र आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतीयांच्या परिषदेमध्ये उत्तर भारतीयांनाच खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांनीच सुनावलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आता त्या मुद्द्यावरून असदुद्दीन ओवैसींनंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राज ठाकरेंच्या दंगलीसंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

‘मी तर आधीच बोललो होतो’

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दंगलींसंदर्भात एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती. ‘एमआयएमचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा डाव असून ही माहिती मला दिल्लीतून मिळाली आहे’, असं वक्तव्य राज ठाकरेंनी भर सभेत केलं होतं. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. ‘राज ठाकरेंना डोकं नाहीये. मी महिन्याभरापूर्वीच हा मुद्दा मांडला होता. राम मंदिरावरून दंगली घडवण्याचा कट रचण्यात आल्याबद्दल मी बोललो होतो. राज ठाकरे माझीच कॉपी करत आहेत’, असं प्रकाश आंबेडकर या मुलाखतीमध्ये म्हणाले.

माझं नाव घेतल्यावर त्यांना ताकद येते – ओवेसी

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांप्रमाणेच ओवेसींनी देखील राज ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘राज ठाकरेंचा आलेख आता घसरू लागला आहे. माझं नाव घेतल्यावर त्यांना जास्त ताकद येत असेल. फक्त स्वत:ला राजकारणात जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर ते करत आहेत’, असं ओवेसी म्हणाले होते.

रेल्वे स्थानकांची नावं तशीच राहावीत – प्रकाश आंबेडकर

याशिवाय, दादर स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी चुकीची असल्याची भूमिका देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली. जय भीम आर्मीने दादर स्थानकाचं नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असं करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी गुरुवारी दादर स्थानकावर आंदोलन देखील करण्यात आलं. मात्र, ‘मुंबईतल्या जुन्या स्थानकांची नावं तशीच राहायला हवीत. या प्रत्येक नावामागे एक इतिहास आहे. ही सात बेटांची मुंबई अखंड करण्यामध्ये योगदान असलेल्या माणसांची नावं तशीच राहायला हवीत’, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.


हेही वाचा – एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी