भारती एअरटेलने सरकारला १० हजार कोटी भरले

एजीआरची थकीत रक्कम अखेर अदा

Mumbai
Indian telecom
भारती एअरटेलने एजीआरची थकीत रक्कम केली अदा

भारती एअरटेलने महसूली उत्पन्नापोटी थकीत असलेल्या पैशांपैकी आज १० हजार कोटी रूपये अदा केले आहेत. एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) महसूली उत्पन्नापोटीचे देय असलेली रक्कम दूरसंचार विभाग (डीओटी)ला देण्यात आली आहे.

आतापर्यंत भारती एअरटेलच्या माध्यमातून ९५०० कोटी रूपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. तर भारती हेक्साकॉममार्फत ५०० कोटी रूपयांची रक्कम अदा करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने जारी केली आहे. या घडामोडीमुळे आज शेअरबाजारात एअरटेलच्या स्टॉकमध्ये किंचित वाढ पहायला मिळाली. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ही १७ मार्च रोजी आहे. भारती एअरटेलकडून यापुढच्या सुनावणीआधी एकदा आढावा घेऊन अदा करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारती एअरटेलची एकुण एजीआरची थकीत रक्कम ३५ हजार कोटी इतकी आहे. त्यापैकी आज पहिल्यांदाच एअरटेलने ही रक्कम अदा केली आहे. याआधी रिलायन्स जिओने एजीआरपोटीचे १९५ कोटी रूपये अदा केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांना थकीत महसुली देय तातडीने भरणे अपेक्षित होते. त्यापैकी एअरटेलने पहिल्या टप्प्यात रक्कम अदा केली आहे. व्होडाफोन आणि आयडियाची थकीत अशी २८ हजार ३०० कोटी रूपयांची रक्कम देय आहे. केंद्र सरकारने एजीआरची थकीत रक्कम अदा करण्यासाठी याआधी तिन्ही कंपन्यांना इशारा दिला होता. दूरसंचार कंपन्यांची प्रतिनिधीत्व करणारी असणारी संघटना सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कंपन्यांच्या पाठिशी उभी राहिली होती. पण रिलायन्स जिओने सीओएआयच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर वोडाफोनसारख्या कंपनीने भारतात व्यवसाय सुरू ठेवणे कठीण होणार असल्याचे विधान केले होते. पण त्यानंतर आपले विधान मागे घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्यानंतर आता एजीआरची रक्कम भरण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी सुरूवात केली आहे.