चैत्यभूमीवर भीमसागर

Mumbai
chaitya bhumi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या प्रमाणात अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर व पोस्टर लावण्यात आले आहेत. लाखोंच्या संख्येने येणार्‍या अनुयायींच्या सोयीसाठी महापालिकेने अनेक सुविधा पुरविल्या आहेत. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनीही सुविधा पुरविल्या आहेत.चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अनुयायी चैत्यभूमीवर येतात. परंतु त्यावेळी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक अनुयायी 6 डिसेंबरपूर्वीच चैत्यभूमीवर जमा होत आहेत.

त्यामुळे मंगळवारपासूनच चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायींची मोठ्या संख्यने उपस्थिती दिसू लागली आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणार्‍या अनुयायींना आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत आहेत. ६ डिसेंबरपूर्वी मुंबईत येण्याला अनुयायी प्राधान्य देत असल्याने त्यांच्या वास्तव्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या लाखो अनुयायींची गर्दी लक्षात घेऊन, विविध राजकीय पक्षांतर्फे राजकीय सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकरी अनुयायींच्या जेवणासाठी शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या प्रत्येक स्टॉलवर दिवसाला 30 ते 40 हजार अनुयायींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्र

चैत्यभूमीवर येणार्‍या आंबेडकर अनुयायींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम, एअर इंडिया व अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत शिवाजी पार्क येथे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये दिवसाला 400 ते 500 जणांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रवासामुळे डोकेदुखी, पायदुखी, पोटात दुखणे, वातावरण बदलामुळे सर्दी, ताप यासारखे आजार असलेले रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

गर्दीच्या नियंत्रणासाठी पाच हजार स्वयंसेवक

समता सैनिक दल व भारतीय बौध्द महासंघातर्फे पाच हजार स्वयंसेवक चैत्यभूमीच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात येणार्‍या अनुयायींच्या गर्दीचे नियोजन करण्याची पूर्ण जबाबदारी या स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे. यामध्ये 1500 महिला स्वयंसेवक आहेत. जर एखादा ग्रुपने अरेरावी केल्यासच पोलिसांना बोलावण्यात येते, अन्यथा संपूर्ण गर्दीचे आम्ही यशस्वीरित्या पोलिसांच्या सहकार्याने नियोजन करतो, अशी माहिती अशोक नागटिळक यांनी दिली.

लोकांची सुरक्षा महत्वाची

6 डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र शिसवे यांनी शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांना शिवाजी पार्क येथे पहिल्यांदाच अनुयायींच्या बॅगा स्कॅनर मशीनमधून तपासल्या जात आहेत. याबाबत शिसवे यांना विचारले असता, मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो लोक शिवाजी पार्क येथे आले आहेत. या अनुयायींची सुरक्षा महत्वाचे असल्याचे शिसवे म्हणाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व काळजी घेतली आहे. या परिसरात 2 हजार पोलीस तैनात केले असल्याचे शिसवे यांनी सांगितले. भीम अनुयायींना पालिकेकडून सुरक्षा पुरवण्यात आली असून पोलीस सुरक्षेची काळजी घेत आहेत. आलेल्या अनुयायींना काही मदत लागल्यास पोलीस कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिसवे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here