धक्कादायक! ठाण्यातील गायब झालेल्या त्या रुग्णावर दुसऱ्याच कुटुंबाने केले अंत्यसंस्कार

Thane
cremation of corona dead body
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाण्यात तीन दिवसांपूर्वी एक कोरोना रुग्ण बेपत्ता झाला होता. तीन दिवस रुग्णालय प्रशासन त्या रुग्णाचा शोध घेत होते. मात्र आता जी माहिती समोर येत आहे, त्याने आपल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. भालचंद्र गायकवाड असे गायब झालेल्या रुग्णाचे नाव होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा मृतदेह सोनवणे या कुटुंबाला देण्यात आला. सोनवणे कुटुंबांने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जे सोनवणे रुग्ण होते ते जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ठाणे महापालिकेने मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कोविड हॉस्पिटलचे उदघाटन केले होते. पण या हॉस्पिटलमध्ये इतका ढिसाळ कारभार चालतो की उपचारासाठी दाखल केलेला रुग्ण कुठे जातो? याची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. गेले चार दिवस कळव्याचे गायकवाड हे रुग्ण हॉस्पिटल मधून गायब होते.

ठाण्यातील भालचंद्र गायकवाड यांना विशेष कोविड रुग्णालयात ४ जुलै रोजी दाखल केले होते. मात्र, त्यांचा दोन दिवसांपासून शोध लागत नसल्याबद्दल गायकवाड कुटुंबीयांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

ठाण्यातील भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे यांनी देखील या प्रकरणावर टीका केली आहे. पारदर्शक बॉडीबॅग नसल्यामुळे नातेवाईकांच्या भावनांशी खेळ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.