घरमुंबईबाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

Subscribe

बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अविनाश अशोक काशिद आणि रुपेश राजेंद्र घडशी अशी या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे नऊ बाईक जप्त केल्या आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात यातील अविनाशने यूट्यूबवर बाईक चोरीचे प्रशिक्षण घेतल्याचे उघडकीस आले आहे. या दोघांविरुद्ध दहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातून बाईक चोरीच्या गुन्ह्यांत काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली होती त्यात मालाड आणि चारकोप पोलीस ठाण्यातून सर्वाधिक बाईक चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे अशा बाईक चोरट्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच रुपेश घडशी आणि अविनाश काशिद या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही रेकॉर्डवरील बाईक चोर असल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

या दोघांनी दहा बाईक चोरीची कबुली दिली, त्यापैकी नऊ चोरीचे बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अविनाशने यू ट्यूबवर बाईक चोरीचे काही व्हिडीओ पाहिले होते, त्यातून त्याने प्रेरणा घेऊन रुपेशच्या मदतीने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली होती. गेल्या सात महिन्यांत त्यांनी या दहा बाईकची चोरी केल्याचे सांगितले. चोरीचे बाईक ते दोघेही विकत होते. बाईकचे कागदपत्रे नंतर देतो असे सांगून ते दोघेही पळून जात होते. मालाड परिसरातून त्यांनी सहा तर कांदिवलीतून चार बाईक चोरी केल्याची कबुलीही या दोघांनी दिली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -