घरमुंबईभाजपासाठी अनुकूल वातावरण - पंकजा मुंडे

भाजपासाठी अनुकूल वातावरण – पंकजा मुंडे

Subscribe

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अनेक कामांमुळे जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असून, लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. २०१४ च्या निवडणूकीत आम्ही तत्कालिन सरकारचे अपयश आणि आम्ही कोणती कामे करणार आहोत या मुद्यांवरून प्रचार केला होता. मात्र, या निवडणूकीत आमच्याकडे आमच्या कामांचा अहवाल आहे. आम्ही केलेली कामेही जनतेसमोर दिसत आहेत. या कामांमुळेच जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असेल असे त्या म्हणल्यात.

सरकारच्या विविध योजना यशस्वी

आपण जलसंधारण मंत्री असताना राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू झाले. यावर्षी कमी पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेमुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाईचा सामना करणे सोपे झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत कधीही रस्त्याने न जोडलेली गावे जोडण्यात यश आले. ग्रामपंचायतीत संरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरूण सरपंचाची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. ही बदली प्रक्रिया न्यायालयाकडूनही कायम झाली. बचतगटांसाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना, महालक्ष्मी सरस उपक्रम आणि अस्मिता योजना यासारख्या ग्रामीण भागातल्या महिला वर्गाला सक्षम करणाऱ्या योजनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -