नाणारचा बळी देऊन कोकणाला युती नको – प्रमोद जठार

युतीनंतर नाणार प्रकल्प रद्द केल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ भाजपमधूनच काही नेतेमंडळींनी विरोध करायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी नाणारचा बळी देऊन कोकणाला युती नको, असा इशारा दिला आहे.

Mumbai
Pramod Jathar

भाजप आणि शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी झालेल्या युतीमधला सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त ठरलेला मुद्दा म्हणजे कोकणच्या राजापूर तालुक्यातला प्रस्तावित नाणार प्रकल्प. नाणार रद्द करण्याच्या पूर्वअटीवरच शिवसेनेने युतीचा प्रस्ताव स्वीकारला. भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी देखील ‘जिथे लोकांची परवानगी असेल, तिथेच नाणार होईल’, असं आश्वासन देऊन नाणारच्या वादावर पडदा टाकला. मात्र, आता भाजपमधूनच नाणारबद्दलच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपचे सिंधुदुर्गातले नेते प्रमोद जठार यांनी नाणारला पूर्ण पाठिंबा जाहीर करून ‘स्थानिकांचं जनमत घेतल्याशिवाय सरकारने नाणार रद्द करू नये. जर नाणारचा बळी देऊन युती होणार असेल, तर कोकणाला युती नको’, असा विनंतीवजा इशाराच सरकारला दिला आहे.

‘कुणीतरी सांगतं म्हणून प्रकल्प रद्द करू नये’

नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासंदर्भात प्रमोद जठार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ‘कोकणातल्या बेरोजगारीवर नाणार हा प्रकल्प रामबाण उपाय आहे. दीड ते दोन लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा प्रकल्प फक्त कुणीतरी सांगतं म्हणून रद्द केला जाऊ नये’, असं ते म्हणाले. ‘आज बेरोजगारीमुळे कोकणात कोकणी माणूस राहात नाही. हा प्रकल्प झाला तर रोजगार वाढेल. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेऊन तयार होणारा हा प्रकल्प रद्द का केला जात आहे?’ असा सवाल देखील जठार यांनी यावेळी विचारला.

जैतापूर, एन्रॉनवेळी राजकीय बार्गेनिंग

दरम्यान, जैतापूर आणि एन्रॉन प्रकल्पांच्या वेळी राजकीय बार्गेनिंग झाल्याचा जाहीर आरोप प्रमोज जठार यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘जैतापूरच्या वेळी पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही का? हा प्रश्न मला राणेंना विचारायचा आहे. कोकणात रोजगार निर्माण होणार तेव्हाच हा प्रकल्प रद्द केला जात आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांची बुद्धी तपासून पाहावी लागेल’, असं वक्तव्य जठार यांनी केलं.


हेही वाचा – महापालिकेतली ‘पहारेकरी’ भाजप आता सत्तेतली ‘वाटेकरी’!

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना भेटणार

येत्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाणारबद्दल भूमिका मांडणार असल्याचं प्रमोद जठार यावेळी म्हणाले. ‘मी युतीच्या विरोधात नाही. बेरोजगारीच्या विरोधात आहे. त्यामुळे सरकारने जनमत घेतल्याशिवाय प्रकल्प रद्द करू नये’, असं देखील ते म्हणाले.

तर निवडणुकीत जनमत विरोधात

यावेळी सरकारला निवडणुकीसंदर्भात प्रमोद जठार यांनी इशारा दिला आहे. ‘तुम्ही जर यावर विचार केला नाहीत, तर येत्या निवडणुकांमध्ये जनमताचा कौल तुमच्या विरोधात जाईल. जर प्रकल्पाला विरोध करणारे शिवसेना, स्वाभिमान आणि काँग्रेस असे ३ उमेदवार कोकणात असतील तर प्रकल्पाला समर्थन करण्यासाठी देखील उमेदवार असायला हवा यावर विचार करावा लागेल’, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here