घरमुंबईपालघरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

पालघरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

Subscribe

भाजप आणि बहुजन विकास आघाडीला फटका

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेने 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 15 जागा जिंकत भाजपला धोबीपछाड केले. सत्ताधारी भाजपला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले. तर बहुजन विकास आघाडीला फटका बसला आहे. जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ झाले आहे. पंचायत समितीतही भाजपला धक्का बसला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक पंचायत समित्यांवर वर्चस्व निर्माण केले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या 57 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्याने 54 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. मागच्या जिल्हा परिषदेत भाजपने 21 जागा जिंकल्या होत्या. त्या खालोखाल शिवसेनेला 14 जागा मिळाला होत्या. तर बहुजन विकास आघाडीकडे दहा जागा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच जागा होत्या. विशेष म्हणजे भाजप सत्तेत असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना, बविआ, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा जवळपास सर्वच पक्ष सत्तेत होते. यावेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. राज्यात असलेले महाआघाडीचे गणित याठिकाणी जुळले न गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीची युती झाली होती. काँग्रेस स्वतंत्रपणे लढत होती.

- Advertisement -

निवडणूक निकालाने भाजपला मोठा दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला जिल्हा परिषदेतही नाकारले गेले आहे. 21 जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. स्वबळावर लढलेल्या शिवसेनेने चार जागा जास्तीच्या जिंकत सर्वाधिक 18 जागा जिंकल्या आहेत. तर अवघ्या पाच जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात 15 जागा आल्या आहेत. पाच जागा असलेल्या माकपने यावेळी सहा जागा जिंकल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडीचा आकडा 10 वरून चारवर आला आहे. काँग्रेसने एक जागा जिंकत आपले खाते उघडले आहे. तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपला मोठा हादरा बसला आहे. पाच पंचायत समितीत सत्ता असलेल्या भाजपला अवघी एकच पंचायत समिती राखता आली आहे. पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. माकपने तलासरीत भाजपचा पराभव करीत सत्ता मिळवली. तर वसईत बविआच्या हातातून पंचायत समिती गेली आहे. याठिकाणी बविआ 3, शिवसेना 3 आणि भाजपला दोन जागा मिळाल्याने पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -