घरमुंबईसरसकट वीज बिल माफ करावे, मुंबई भाजपची सरकारकडे मागणी!

सरसकट वीज बिल माफ करावे, मुंबई भाजपची सरकारकडे मागणी!

Subscribe

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक उद्योदधंद्यांना याचा फटका बसला असून हजारोंचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीत मुंबईमध्ये अदानी आणि बेस्टकडून ग्राहकांना वाढीव रकमेची वीजबिले पाठवली जात आहेत. ही बिलं सरसकट माफ करण्यात यावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रोहिदास लोखंडे यांनी केली आहे. ‘ज्यांना दोन वेळच्या खाण्याची चिंता आहे, अशा झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना देखील हजारो रुपयांची बिलं आलेली आहेत. ही लोकं वीजबिल भरणार कुठून?’ असा सवाल देखील रोहिदास लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या ५ महिन्यांपासून लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या हातचा कामधंदा गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सध्या सामना करावा लागत आहे. मात्र, या परिस्थितीत देखील वीज कंपन्यांकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारलं जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं होतं की १०० युनिटपर्यंतची वीजबिलं माफ करण्यात आलेली आहेत. त्यासाठी राज्य सरकारने १ हजार कोटींचा निधी देखील बाजूला काढून ठेवला आहे. पण मग हा निधी राज्य सरकार आता का वापरत नाही? असा सवाल देखील लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुलाबा, कफ परेड, क्रॉफर्ड मार्केट, चिरा बाजार, काळबादेवी, गिरगाव, ताडदेव, वरळी, शिवडी, भायखळा, नागपाडा, सात रस्ता, चिंचपोकळी आदी भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाढीव वीज बिलं आली आहेत. या नागरिकांसाठी ही बिलं भरणं अवघड झालं आहे. त्यामुळे सरकारने सरसकट वीज बिले माफ करावीत अशी मागणी रोहिदास लोखंडे यांनी ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलताना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -