पालघरमधून भाजप आऊट, शिवसेना इन

बविआ-शिवसेना थेट लढतीचीच शक्यता

Mumbai
22-Palghar
पालघर

सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत युतीने शिवसेनेसाठी जागा सोडली असून विद्यमान खासदार असलेला भाजपा या निवडणुकीतून बाहेर गेला आहे. परिणामी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेतच थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडी आणि युतीचे समान बलाबल आहे. सहापैकी तीन विधानसभा हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे तर दोन भाजप आणि एक विधानसभा शिवसेनेकडे आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडीने तर डहाणू आणि विक्रमगड भाजपने जिंकल्या आहेत.पालघरचा गड मात्र शिवसेनेने स्वतःकडे राखला आहे.

अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभेची पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली होती. त्यापूर्वी गोरेगांव ते पालघर असा उत्तर मुंबई मतदार संघ अस्तित्वात होता. त्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा पालघर मतदार संघ नव्याने तयार झाला. या मतदार संघाच्या पहिल्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 2 लाख 23 हजार 234 मते घेऊन भाजपाचे चिंतामण वनगा यांचा 12 हजार 359 मतांनी पराभव केला होता.

2014 ला झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेत चिंतामण वनगा यांनी बळीराम जाधव यांचा तब्बल 2 लाख 39 हजार 520 मतांनी पराभव केला होता. 2018 मध्ये वनगा यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या पालघरसाठी पोटनिवडणूक झाली. त्यावेळी राजकिय वर्तुळात मोठे बदल झाले होते. वनगांच्या निधनांतर त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याऐवजी भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राजकिय कुरघोडी करत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तर बविआने पुन्हा बळीराम जाधव यांना उभे केले. काँग्रसनेही पालघरमधील आपले भवितव्य आजमावण्याचे ठरवून दामु शिंगडा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या तीनही पक्षांसह हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई होती.

त्यामुळे भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावून गावीत यांचा प्रचार केला. गावितांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्यासह 22 आमदारांनी पालघर पिंजून काढला होता. तर शिवसेनेनेही वनगा यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, रविंद्र फाटक, आदित्य ठाकरे, दिपक केसरकर, आदेश बांदेकर, दिवाकर रावते पणाला लावले होते. तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई आणि मोहन प्रकाश यांना प्रचारात उतरवले होते. बहुजन विकास आघाडीने उत्तर भारतीय मतदार लक्षात घेऊन उत्तर भारतीय सुपस्टार दिनेशलाल यादवचा जाहीर कार्यक्रम ठेवून आपला प्रचार केला होता.

या अटीतटीच्या लढतीत भाजपाने मात्र बाजी मारत आपली जागा राखली. भाजपाच्या गावीत यांनी वनगा यांच्यावर मात करीत 29 हजार 474 मतांनी विजय मिळवला. बविआचे जाधव तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. या तिघांनी मात्र 2 लाखांच्या वर मते मिळवली. तर शिंगडा यांना 47 हजार मते पडली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र, मागील तीनही निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र असणार आहे. भाजपाने ही जागा शिवसेनेसाठी सोडल्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीनेही अजूनपर्यंत पालघरमध्ये रस न दाखवल्यामुळे दामु शिंगडा रिंगणाबाहेर असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच थेट लढतीची शक्यता तूर्तास निर्माण झाली आहे.

देशातील सर्व जाती-धर्माचे लोक जिल्ह्यात वास्तव्याला असल्यामुळे पालघरला मिनी भारत म्हणून संबोधण्यात येत आहे. या मतदार संघात ख्रिस्ती मते सर्वाधिक आहेत. त्यांच्या एकगठ्ठा मतदानाचा सर्व निवडणुकीत परिणाम दिसून आला आहे. बोईसर विधानसभा मतदार संघातील उत्तर भारतीयांची मतेही निर्णायक ठरु शकतील. तत्पूर्वी 24 मार्चला पालघर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक सर्वपक्षीयांच्या दृष्टीने सराव सामना असणार आहे.

पालघर लोकसभा मतदार संघात येणारे विधानसभा संघ आणि आमदार

1) वसई- हितेंद्र ठाकुर- बहुजन विकास आघाडी
2) नालासोपारा- क्षितीज ठाकुर- बहुजन विकास आघाडी
3) बोईसर – विलास तरे – बहुजन विकास आघाडी
4) डहाणू – पास्कल धनारे – भाजपा
5) विक्रमगड – विष्णु सवरा – भाजपा
6) पालघर – अमीत घोडा – शिवसेना

2018 मधील पोटनिवडणुकीची आकडेवारी

राजेंद्र गावीत – भाजपा – 2 लाख 72 हजार 780
श्रीनिवास वनगा- शिवसेना- 2 लाख 43 हजार 206
बळीराम जाधव – बहुजन विकास आघाडी- 2 लाख 22 हजार 837
दामु शिंगडा – काँग्रेस – 47 हजार 713

मतदार संघात येणारे तालुके

पालघर, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, तलासरी, वाडा, जव्हार, वसई

समस्या-

पार्कींग,रेल्वे प्रवास,अनधिकृत बांधकामे,वाढती गुन्हेगारी, एमएमआरडीएचा विकास आराखडा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here