भाजपाच्या श्वेता शालिनींसह जिम मालक, फिटनेस सेंटरचे प्रमुख राज्यपालांच्या भेटीला

भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी आज, बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत फिटनेस प्रोफेशनल्स, व्यायामशाळा मालक आणि संटघना होत्या. यावेळी त्यांनी, त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांची मांडणी राज्यपालांसमोर केली. मोठ्या प्रमाणावर फिटनेस प्रोफेशनल्स आणि ट्रेनर्स हे मध्यमवर्गीय असून लॉकडाऊनमध्ये जिम बंद असल्याकारणाने त्यांनादेखील आर्थिक अडचणीला सामोर जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे जिम मालकही तोट्यात असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे काही जिम मालकांना जिम्स बंद कराव्या लगल्या आहेत, तर काहींनी जिममधील फिटनेस एक्सपर्ट्स आणि प्रशिक्षकांना नोकरीवरुन कमी केले आहे.

मिशन बिगिन अगेननुसार महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना, रेस्टॉरंट्स अंतिम टप्प्यात उघडले गेले आहेत. तर दुसरीकडे जिम मालक आणि फिटनेस प्रोफेशनल्स जिम सुरु करण्याच्या चर्चेसाठी अजूनही वाट पाहत असून सरकार त्यांच्याकडे डोळेझाक करत आहे.

फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश भारते, एमडी स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉ. अतीब शेख, क्रिस गेथिन जिमचे ललित धर्मानी, जेएमके फिटनेसचे रितेश शाह, नायट्रो फिटनेसचे प्रबोध डावखरे, कोर फिटनेसचे राजेंद्र कुमार, वन अबाउ फिटनेसचे विश्वास शिंदे, अबू बकर बॉम्बे फिटनेसचे खान, एज फिटनेसचे विराज करिया, जेव्हलिन फिटनेसचे प्रवीण पांडव आणि फिटनेस एम्पायरचे संदीप गोळे यांनी राज्यापालांना पुष्पगुच्छ प्रदान करुन त्यांच्याकडे आदेशपत्राची विनंती केली.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रवक्त्या, श्वेता शालिनी यांनी सांगितले की ‘आरोग्या प्रति जागरूक असलेले लोक म्हणजे फिटनेस प्रोफेशनल्स सोशल डिस्टेसिंगचे नियम पाळून त्यांचे काम उत्तमप्रकारे सांभाळू शकतात. त्याचप्रमाणे व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोविड-१९ विरुद्ध लढण्यास मदतच होईल. हा अनेक जणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असूनदेखील राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यपालांनी उपस्थित जिम मालकांच्या समस्या गांभीर्याने ऐकल्या आणि त्याची विनंती विचारात घेण्याचे आश्वासन दिले.’

फिटनेस प्रोफेशनल्सचे अध्यक्ष शैलेश भारते म्हणाले की, गेल्या ६ महिन्यांपासून आर्थिक उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्या कारणाने फिटनेस व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर नोकरदार वर्गाप्रमाणे आम्हाला वर्क फ्रॉम होम अथवा ऑनलाइन पर्याय उपयुक्त नाही. तसेच कोविडच्या भीतीने लोकं आम्हाला भेटण्यासही घाबरत आहेत. या समस्यांबाबत आम्ही राज्यपालांना सांगितले असून जिम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा –

महत्त्वाची बातमी! सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू