५ राज्यांत काँग्रेस आणणार भाजपच्या नाकि दम

Mumbai
Congress,Bjp
bjp congress logo

पाच राज्यांमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर आजतक, स्टार, रिपब्लिक आणि सीवोटर तसेच न्यूज नेशन या संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये या पाचही राज्यांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात सलग चौथ्यांदा भाजप सरकार स्थापन करेल, असा अंदाज टाईम्सनाऊने दिला असून, रिपब्लिक आणि सीवोटर, न्यूज नेशन यांनी मात्र भाजपला धक्का बसेल, असे अनुमान काढले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने विजयी होईल, तर छत्तीसगडमध्येही काँग्रेसला कडवी झुंज द्यावी लागेल, असे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. भाजप मागील पंधरा वर्षांपासून छत्तीसगडमध्ये सत्तेवर आहे.

टाइम्स नाऊ – सीएनएक्सने केलेल्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये भाजपाला 46, काँग्रेसला 35, बसपा आघाडीला 7 आणि इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र न्यूज नेशनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 38 ते 42, काँग्रेसला 40 ते 44 तर जेसीसी-बसपा आघाडीला 4 ते आणि इतरांना 0 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपब्लिक आणि सी वोटरच्या एक्झिट पोलमध्येही छत्तीसगडमधून भाजपाच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेमध्ये राज्यात भाजपाला 35 ते 43 तर काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या अंदाजात मध्य प्रदेशात भाजप सलग चौथ्यांदा सत्ता मिळवेल, असे म्हटले आहे. पण इंडिया टुडे, अ‍ॅक्सिस माय इंडिया आणि रिपब्लिक-सीवोटरने राज्यात काँग्रेस आघाडी घेईल, असा अंदाज वर्तवला आहे. टाईम्स नाऊच्या अंदाजानुसार भाजपला १२६ जागा मिळतील, असे म्हटले आहे. तर इंडिया टुडेने सर्वाधिक १०४ जागा काँग्रेसला मिळतील, असे म्हटले आहे. रिपब्लिक-सीवोटरने मध्य प्रदेशात काँग्रेसला ११० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर भाजपला ९६ जागांवर यश मिळेल, असे म्हटले आहे.

तेलंगणातही भाजपचा फारसा निभाव लागणार नाही, असे अंदाज पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी अदित्यनाथ यांच्या जाहीर सभा घेऊनही भाजपला त्याचा फायदा होणार नाही, असे अंदाजात म्हटले आहे. टाईम्सनाऊच्या अंदाजात चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसला ११९ पैकी ६६ जागा मिळतील, असे म्हटले आहे. काँग्रेस आणि तेलगू देशम पार्टीला ३७ ठिकाणी यश मिळेल तर भाजपला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले आहे.

राजस्थानात भाजपची निम्म्याहून अधिक जागा पडतील, असे अंदाज टाईम्सनाऊने वर्तवले आहेत. या राज्यात काँग्रेस १०५ जागांवर विजयी होईल, तर भाजपला केवळ ८५ जागा मिळतील, असेही टाईम्सनाऊने म्हटले आहे. तर आजतक-एक्सिसच्या चाचणीत भाजपला केवळ ६३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर काँग्रेस १३० जागा घेऊन सत्तेवर येईल, असे म्हटले आहे.

कुणाला मिळणार खुर्ची? काय सांगतो एक्झिट पोल?

मध्यप्रदेश - जागा २३०
सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा - ११६
काँग्रेस - ११०
भाजप - ११०
बसपा - ०० 
इतर - १०

राजस्थान - जागा १९९
सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा - १०१
काँग्रेस - १०८
भाजप - ८१
बसपा - ०१
इतर - ००

तेलंगना - जागा ११९
सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा - ६०
टीआरएस - ७६
काँग्रेस + इतर - ३२
भाजप - ०४
इतर - ०७

छत्तीसगड - जागा ९०
सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा - ४६
काँग्रेस - ४५
भाजप - ३९
भाजप - ०६.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here