घरमुंबईराम कदम  औटघटकेचे भाजप प्रवक्ते; लवकरच होणार  उचलबांगडी

राम कदम  औटघटकेचे भाजप प्रवक्ते; लवकरच होणार  उचलबांगडी

Subscribe

‘पसंत असलेली मुलगी सांगा, आम्ही तिला पळवून आणू,’ असे बेताल वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्याकडील पक्ष प्रवक्ते पद तातडीने काढून घेण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. कदम यांच्यावर मुंबईसह राज्यभर जोरदार टीका सुरू आहे

‘पसंत असलेली मुलगी सांगा, आम्ही तिला पळवून आणू,’ असे बेताल वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्याकडील पक्ष प्रवक्ते पद तातडीने काढून घेण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. कदम यांच्यावर मुंबईसह राज्यभर जोरदार टीका सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाज माध्यमांमध्ये पक्षाची छबी पुरती बिघडत आहे. याची दखल घेत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कदम यांना प्रवक्तेपदावरून तात्काळ दूर करा, असे आदेश दिले आहेत.

पक्षाने कारवाई केल्याचा मेसेज लोकांना देण्याच्या दृष्टीने ही कारवाई तात्काळ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे भाजपतील राज्यातील ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले. पक्षात बाहेरून येऊन तिखट झालेल्यांवर कोणाचाच अंकुश नसल्याची बाबही या निमित्ताने पक्षात चर्चिली जाऊ लागली आहे. दहीहंडीच्या दिवशी घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी मुक्ताफळे उधळली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपकडून एकही नेता, प्रवक्ता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांनंतरही राम कदम यांच्या वक्तव्याचा साधा निषेध केलेला नाही. सर्वजण मूग गिळून गप्प आहेत.

- Advertisement -

कदम यांच्या बेताल मुक्ताफळांची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे. यामुळे भाजपचीही पुरती बदनामी होत आहे. प्रसार माध्यमांनी कदम यांच्या या कृत्याची दखल घेत भाजपला अक्षरश: घेरले आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांमध्ये पक्षाची नको तितकी बेअदबी होत असल्याचे उघड झाले आहे. भाजप वगळता सगळ्ेच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी या घटनेचा जोरदार निषेध केला आहे. सहकारी शिवसेनेने तर कदम यांना निवडणुकीचे कोणीही तिकीट देऊ नये, असे जाहीर आवाहन करत घटनेचा निषेध नोंदवला आहे. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कदम यांच्या कृत्याबाबत भाजपलाच दोषी धरले आहे

कदम यांच्यामुळे समाज माध्यमांमधून पक्षावर कधी झाली नव्हे, अशी टीका सुरू केली आहे. यामुळे यापूर्वी नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची उजळणीही वृत्तवाहिन्यांनी सुरू केली आहे. यात राज्याबाहेरील नेत्यांचाही समावेश आल्यावर त्याची दखल पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनी घेतली आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही याबाबत विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तातडीने कारवाई न झाल्यास पक्षविरोधी मेसेज जाईल आणि त्याचे विपरीत परिणाम पक्षाला सोसावे लागतील, असेही सांगण्यात आले. अमित शहा यांच्या सूचनेनंतर कदम यांच्याकडील प्रवक्तेपद काढून घेण्याची तयारी पक्षाने सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. कदम यांच्याकडील प्रवक्तेपदाबाबतही पक्षात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पक्ष धोरणाबाहेर जात कदम यांनी अनेकदा भाजपला अडचणीत टाकले होते, याची माहितीही या निमित्ताने काही नेत्यांनी दिली.

- Advertisement -

कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागताच प्रदेश भाजपच्या पदाधिकार्‍यांनीही कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला. पक्षाची होत असलेली हानी पाहून मग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय प्रदेश भाजपला घ्यावा लागल्याचीही माहिती पुढे आली आहे. या नोटीसला कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. भाजपमध्ये मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह मधु चव्हाण, केशव उपाध्ये, गिरीष व्यास, शिरिष बोराळकर, गणेश हाके, विश्वास पाठक, श्वेता शालिनी, सुहास परांदे, श्रीपाद देखणे, अतुल शहा, अवधूत वाघ, शिवराय कुलकर्णी, प्रशांत बम आणि राम कदम या प्रवक्त्यांचा समावेश आहे. या यादीतून वादग्रस्त कदम यांची हाकलपट्टी केली जाणार का? अशी विचारणा होत आहे.

राम कदम यांचा इतिहासच वादग्रस्त

दहीहंडी उत्सवात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सध्या भाजपाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम चर्चेत आहेत. त्यांच्यावर आता चहुबाजूने टीका होत आहे. मात्र स्वत:ला दयावान आणि डॅशिंग म्हणवून घेणार्‍या राम कदमांचे प्रताप पाहिले तर तुमचेही डोळे विस्फारतील. तसे वाद आणि राम कदम यांचे नाते जुनेच आहे. पूर्वी मनसे या पक्षात असतानादेखील राम कदम येनकेनप्रकारे चर्चेत राहायचे. मतदारसंघात जरी दानशूर म्हणून राम कदम फेमस असले तरी राजकीय वर्तुळात मात्र ते वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे कलियुगातला राम ‘वादग्रस्त’ आहे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राम कदमांचे याआधीचे प्रताप 

 २०१३ मध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनातच राम कदम यांनी पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राम कदम यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या कृत्यावर तेव्हा मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता.  

२०१४ साली श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थी आणल्याचा दावा आमदार राम कदम यांनी केला होता. तसेच विक्रोळी, घाटकोपरमध्ये बॅनरबाजी करून 18 ते 20 एप्रिल २०१४ दरम्यान या अस्थींच्या दर्शनासाठी त्यांनी आपल्या घरी दलित बांधवांना आमंत्रण दिले होते. या अस्थींबाबत जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या तीन तरुण कार्यकर्त्यांना राम कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. या वेळी जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी राम कदम यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सध्या भाजपामध्ये आमदार असलेल्या राम कदम यांनी मनसेमध्ये असताना घाटकोपर येथे रेशनिंग कार्यालयातील अधिकारी महेश पाटील यांना २०१३ मध्ये मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना विक्रोळी न्यायालायात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी राम कदम यांच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद क्रमांक २१/ २०१३ अंतर्गत भा. द. वि. कलम १०७,३५३, १४१, १४३, १४७, १४९, ३३६, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात हस्तक्षेप, कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकार्‍याला धमकावणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

माझा अर्धवट व्हिडिओ दाखवला
माझ्या घाटकोपरच्या दहीहंडीत मी काय बोललो याचा अर्धवट व्हिडिओ दाखवला आणि पसरवला. त्यामुळे कोणताही खुलास न करता अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो.
– राम कदम, आमदार, भाजप

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -