घरताज्या घडामोडी'काँग्रेसला सत्तेतले मित्रपक्ष तरी विचारतात का?' भाजपचा खोचक सवाल!

‘काँग्रेसला सत्तेतले मित्रपक्ष तरी विचारतात का?’ भाजपचा खोचक सवाल!

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी महाविकासआघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे सुरू झालेले असतानाच भाजपनं काँग्रेसवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ‘ज्या ग्रामपंचायतींचा निकाल लागला, त्या सगळ्याची आकडेवारी आमच्याकडे आहे. काँग्रेस नेहमीच वरवरचे दावे करत असते. आम्ही पुराव्यांनिशी बोलतो’, असा खोचक टोमणा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मारला आहे. तसेच, ‘काँग्रेसने आधी त्यांचे मित्रपक्षच त्यांना विचारतात का? हे पाहावं’, असं देखील ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसची अवस्था दयनीय…

दरम्यान, यावेळी बोलताना केशव उपाध्ये यांनी काँग्रेसची अवस्था दयनीय झाल्याची टीका केली. ‘पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांना धक्का देत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. काँग्रेसनं ४ हजारपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. पण काँग्रेसचा दावा सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का? काँग्रेस विधानसभा, लोकसभेला चौथ्या क्रमांकावर होती. काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांनी दावा केला आहे, पण त्यांना सत्तेतले २ पक्ष तरी विचारतात का हे त्यांनी सांगावं’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

भाजप ६ हजारांवर ठाम

राज्यात ६ हजारांहून जास्त ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं विजय मिळवला असल्याचा दावा यावेळी केशव उपाध्ये यांनी केला. ‘भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे. इतर पक्षांनी आम्हीच कसे मोठे, असं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही ६ हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकू असा विश्वास आम्ही काल केला व्यक्त होता. गावागावातल्या निवडणुकीत सर्वसामान्य गावकऱ्यांनी विश्वास दाखवला आणि भाजपनं ६ हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आम्ही ठोस आकडेवारीवर बोलतो, कोणत्याही दाव्यावर बोलत नाही’, अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -