घरमुंबईसेना उमेदवारांच्या वाटेत भाजपच्या ४७ अपक्षांचे काटे

सेना उमेदवारांच्या वाटेत भाजपच्या ४७ अपक्षांचे काटे

Subscribe

भाजप-शिवसेना युती घोषित होणे बाकी असताना उमेदवारीचे आश्वासन दिलेल्या कार्यकर्त्यांना आवरायचे कसे, अशा संकटात भाजपचे नेते सापडले आहेत. युती होण्याआधीच भाजपने आपल्या २८८ उमेदवारांची तयारी केली होती. ज्यांना कामाला लागण्यास सांगण्यात आले होते ते आता उमेदवारीसाठी अडले आहेत. युती झाल्यास सेना उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करण्याच्या तयारीला हे कथित उमेदवार लागले आहेत. या उमेदवारांना भाजपच्या नेत्यांचीच फूस असल्याची जोरदार चर्चा सेनेच्या वर्तुळात आहे. सेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उघडपणे लढणे अवघड असल्याने या उमेदवारांना पक्षातून काढण्याची तयारीही भाजपने सुरू केली आहे. मात्र यामुळे सेना उमेदवारांच्या वाटेत संकटाचे काटे निर्माण झाले आहेत.

राज्य विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधी भाजप-सेना युतीची तयारी सुरू झाली होती. युतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने दोन्ही पक्षांनी आडेवेडे घेतले होते. यामुळे २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच युतीत शकले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आपल्या सर्वच म्हणजे २८८ जागांची चाचपणी करत तितक्या उमेदवारांची तयारीही केली होती. संभाव्य उमेदवारांची यादी करून त्या उमेदवारांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नेत्यांच्या आदेशानंतर हे उमेदवार कामाला लागले होते. त्यांनी आपापल्या मतदारसंघात मेळावे घेत ताकद दाखवली. या मेळाव्यांना पक्षाच्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनीही हजेरी लावली. यामुळे या उमेदवारांच्या अपेक्षा बळावल्या.

- Advertisement -

आता युती होणे निश्चित झाल्याने या उमेवारांनी उचल खाल्ली आहे. सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या मतदारसंघात उमेदवारी मिळणे शक्य नसले तरी अनेकजण निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीला लागले आहेत. या संभाव्य उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याची फूस भाजपच्याच नेत्यांकडून मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. यामुळेच युती अंतिम टप्प्यात असताना या उमेदवारांनी स्वत:चा प्रचार सुरू केला आहे. सेनेच्या विद्यमान आमदारांविरोधात पहिल्या टप्प्यात मुंबईतील पाच, रायगड जिल्ह्यातील तीन, ठाण्यातील एक, पालघर दोन, रत्नागिरीतील दोन, सिंधुदुर्गमधील दोन अशा मुंबईसह कोकणातील १५, पश्चिम महाराष्ट्रातील चार, मराठवाड्यातील चार, उत्तर महाराष्ट्रातील तीन अशा भाजपच्या इच्छुकांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याने ते अपक्ष उमेदवारी भरण्याच्या तयारीला लागले आहेत. ही बाब सेनेच्या त्या त्या उमेदवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कानी घातल्याची माहिती मिळते. मात्र युती झाल्यावर याबाबत काय ते ठरवू, असं सांगत उध्दव यांनी आपल्या विद्यमान उमेदवारांची समज काढल्याचे सांगण्यात आले.

युती झाल्यावर निवडणुकीत भाजपकडून ज्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल त्याशिवाय कोणीही उमेदवारी भरणार नाही. पक्षादेशाचे उल्लंघन करणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर रितसर कारवाई होईल.
– मधू चव्हाण, प्रवक्ते, भाजप

- Advertisement -

राज्यात उमेदवारी भरू पाहणार्‍या काही अपक्षांची नावे पुढे येऊ लागली आहेत. युती झाल्यावर उमेदवारांपुढे अडचण उभी करणार्‍यांचा बंदोबस्त युतीतल्या दोन्ही पक्षांना करायचा आहे. पक्षातून काढूनही अपक्ष उमेदवारीचा पुरस्कार करणार्‍यांची माहिती लपून राहणार नाही. स्वत: प्रामाणिकपणे युतीचा प्रचार केला तर कोणतेही संकट येणार नाही.                                                                                                                          – निलम गोर्‍हे, प्रवक्ते, शिवसेना

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -