निवृत्त नौदल अधिकारी मारहाणप्रकरणी भाजपचे शिवसेनेविरोधात आंदोलन

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करुनही त्यांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. याप्रकरणी भाजपतर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रवीण दरेकर तसेच इतर आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समाविष्ट करण्याचे आश्वासन यावेळी पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिले. प्रवीण दरेकर आणि विश्वास नांगरे पाटील यांची चर्चा सुरु असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना फोन करत त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली.

काय म्हणाले प्रवीण दरेकर 

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली. शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले, पण लगेच सोडून दिले. पोलिसांनी जी कलमं लावणं अपेक्षित होतं, ती लावली नाही. ती लावावी यासाठी आम्ही आज आंदोलन केलं. पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन केलं. पोलिसांनी कलमं वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. जर ही कलमं लावली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु.

तर याप्रकरणी विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, जी मारहाण झाली आहे, त्याबाबत कलम ३२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली. मात्र हे कलम जामीनास पात्र असल्याने, आरोपींना जामीन मंजूर झाला. आंदोलकांकडून कलम ३२६ आणि ४५२ ही कलमं लावण्याची मागणी आहे. ३२६ कमल हे धारदार हत्यारांनी वार आणि ४५२ कलम घरात घुसून मारहाण यासाठी आहे. ४५२ हे कलम वाढवण्यात येईल.

 

 

हेही वाचा –

KEM मध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ; Video व्हायरल!