घरदेश-विदेशभाजपचे विमान जमिनीवर!

भाजपचे विमान जमिनीवर!

Subscribe

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जाणारी ही निवडणूक काँग्रेसने जिंकली असेच म्हणावे लागेल. पाचपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या महत्त्वाच्या आणि तुलनेने मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस विजयी झाली आहे. त्याचा दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. या निवडणुकीच्या विजयामुळे काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले हे कोणीही नाकारू शकत नाही. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये एकप्रकारची मरगळ आली होती. त्याचाच परिणाम म्हणजे देशातील एकापाठोपाठ एक राज्ये काँग्रेसने गमावली होती. मात्र पाच राज्यात झालेल्या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये आलेली मरगळ संपुष्टात आणली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आता आगामी निवडणुकांना जोमाने सामोरे जाणार असल्यामुळे ती काँग्रेससाठी संजीवनी ठरली आहे.

दुसर्‍या बाजूला या निवडणुकांनी राहुल गांधींना नेते म्हणून प्रस्थापित केले आहे. सोनिया गांधींनी राजकारणातून माघार घेतल्यानंतर राहुल गांधींना काँग्रेसचे नेते म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पण राहुल गांधींना प्रस्थापित करणे काँग्रेसला जमत नव्हते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या देशातील विविध विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधींची राजकारणाची समज आणि त्यांचे ज्ञान यामुळे विरोधक त्यांची हेटाळणी करत होते. या निवडणुकीमुळे राहुल गांधींना काँग्रेसचा नेता म्हणून देशातील जनता मान्य करू लागली असल्याचे आता विरोधकांनाही मान्य करावे लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या पंतप्रधानपदावर राहुल गांधींचा दावा भक्कम झाला आहे. या निवडणुकांनी भाजपला अस्मान दाखवले आहे. त्याचा परिणाम निश्चितच देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर होणार आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विकासाची पावले उचलूनही त्याचा कोणताही फायदा भाजपला झाला नाही, असा समज भाजप नेत्यांचा होऊ शकतो.

- Advertisement -

त्यामुळे आगामी काळात भाजपचे राजकारण जास्तीतजास्त भावनिक मुद्यांकडे वळू शकते. हिंदूंची मते मिळवण्यासाठी आगामी काळात राम मंदिराचे विधेयक संसदेत संमत झाल्यास फारसे नवल वाटायला नको. हिंदू हिताचे राजकारण करताना देशात धुव्रीकरणाची लाट येऊ शकते. राम मंदिराचा मुद्दा आगामी काळात लवकरच निकाली काढला जाऊन भाजप अधिकाधिक कट्टर हिंदुत्त्वाच्या राजकारणाच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो. या निवडणूक निकालाने महागठबंधनामागील दावेही फोल ठरवले आहेत. जो पक्ष काँग्रेससोबत जातो त्याच्या जागा घटतात, मात्र काँग्रेसला संजीवनी मिळते हा इतिहास पुन्हा जागा झाला आहे.

तेलंगणामध्ये चंद्राबाबू नायडूंचा पक्ष तेलगू देसमने काँग्रेससोबत आघाडी केली होती. मात्र त्यामुळे तेलगू देसमच्या जागा १३ वरून थेट २ जागांपर्यंत खाली आल्या आहेत. या उलट मायावतींनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये बसपा आपले अस्तित्व राखू शकला आहे. आगामी काळात काँग्रेससोबत आघाडी करायची का? याचा विचार लहान राजकीय पक्षांना करावा लागणार आहे. सरतेशेवटी या निवडणुकांमध्ये भाजपसाठी त्या, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा, पंतप्रधान मोदींचा करिष्मा आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे व्यवस्थापन चालले नाही, हेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -