विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याने विद्यार्थी आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाले असून आज विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे.

Mumbai
Black flags shown education minister chhatra bharti student wing in prabhadevi
छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

‘शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा’, अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला. दहावी, बारावी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आज रविंद्र नाट्य मंदिर येथे आले होते. त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना ‘तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुुरु आहे’, असे शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. त्यावर आक्षेप घेत छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी, तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि कॉलेजेस आधी एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावेत. आधी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन करा. मगच इतरांची अ‍ॅडमिशन करा. विनाअनुदानित तुकडीतील अकरावी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल. तसेच अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे जे एसएससी बोर्डांचे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे, असा आग्रह धरला. त्यानंतर याविषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छात्र भारतीच्या शिष्टमंडाळासोबत बैठकीचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुले नापास झाली आहेत. याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत. त्यांचा निकालही चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डांच्या मुलांना बसणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागेल अशा अनेक अडचणींचा सामना एसएससी बोर्डांच्या मुलांना करावा लागणार आहे. यामुळे एसएससी बोर्डांच्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


हेही वाचा – टीईटी नसलेल्या शिक्षकांचे वेतन अडवले जाणार नाही- शिक्षणमंत्री

हेही वाचा – अकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता १० टक्के- शिक्षणमंत्री