घरनवरात्रौत्सव 2022नेत्रहिनांची वाट उजळवणारी तपस्विनी

नेत्रहिनांची वाट उजळवणारी तपस्विनी

Subscribe

परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, याचा प्रत्यय अनेक घटनांतून आपल्याला येतो. माझगावमध्ये राहणार्‍या नेत्रहीन उमेहानी बगसरवाला हिने सुद्धा बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आलेल्या अनुभवातून आपल्या नेत्रहीन बंधुभागिनींसाठी मार्गदर्शकाचे कार्य करत आहे. दहावी व बारावीसह विविध परीक्षांना बसणार्‍या अंध विद्यार्थ्याना परीक्षेवेळी लेखनिक व वाचक मिळत नसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करणे व उच्च शिक्षण घेण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षण घेताना आलेल्या अनुभवातून उमेहानी हिने आपल्या नेत्रहीनांसाठी लेखनिक व वाचक शोधण्याचे काम हाती घेत त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आजवर तिने अनेक अंध विद्यार्थ्यांना मदत करत एखाद्या दृष्टी असलेल्या व्यक्तीला लाजवेल असे कार्य केले आहे.

माझगावमध्ये राहत असलेली उमेहानी बगसरवाला ही आर्किटेक्ट असून सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. अंध असलेल्या उमेहानीला दहावी व बारावीची परीक्षा देताना लेखनिक मिळवण्यात अनेक अडचणी आल्या. परंतु, उमेहानी व तिच्या कुटुंबांनी जिद्द न सोडता लेखनिक मिळवले. उमेहानीने कॉलेजला प्रवेश घेतल्यावर अंध विद्यार्थ्याना रीडरची (वाचक) गरज भासत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर आता लेखनिकबरोबरच वाचक शोधण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू झाले.

- Advertisement -

दहावी, बारावी व उच्च शिक्षण घेताना तिला ज्या लेखनिक व रिडरनी मदतीचा हात दिला. त्यांच्या माध्यमातून तिने अन्य अंध विद्यार्थ्यांना मदत करण्यास सुरुवात केली. उमेहानीकडून लेखनिक व रिडर उपलब्ध होत असल्याने अनेक अंध विद्यार्थी तिच्याशी संपर्क करू लागले. त्यासाठी उमेहानीने ‘पर्ल्स ऑफ व्हिजन’ नावाची संस्था सुरू केली आहे. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक शाळा व कॉलेजांच्या प्राचार्यांशी संपर्क साधला. मात्र संस्था नोंदणीकृत नसल्याचे सांगत त्यांना मदतीस काहीजणांकडून टाळाटाळ झाली. संस्थेची नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आसरा घेत व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून लेखनिक व रिडर शोधण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अनेकदा शिक्षण विभागाच्या वयाच्या अटीमुळे लेखनिक उपलब्ध असूनही त्यांना विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवता येत नाही. तसेच अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी मदत करण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये फारशी जागरुकता नसल्याने त्याचा फटका बसत असल्याची खंतही उमेहानीकडून व्यक्त करण्यात येत आहे. उमेहानीकडून अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या लेखनिक व रिडर मोफत उपलब्ध करून देण्यात येतात.

- Advertisement -

मदतीसाठी पुढे येणारे अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी मुंबईबाहेरून आलेले असतात. त्यांना हॉस्टेलमध्ये राहावे लागत असल्याने त्यांना त्यांचा खर्च भागवणे जिकीरीचे होते असते. त्यामुळे बर्‍याचदा काही विद्यार्थी तिच्याकडे पैशांची मागणी करतात. अशावेळी उमेहानी अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून एकही पैसा न घेता स्वत:कडील पैसे लेखनिक व रिडरना देत त्यांची गरज पूर्ण करते.

मदतीसाठी संपर्क
उमेहानीला आवश्यक असलेल्या लेखनिक व रिडरसाठी मदत करण्यासाठी तिला [email protected] या ईमेल आयडीवर तसेच @perls_of vision या ट्विवटर हँडलर व perlsofvision_ या इन्स्टाग्रामवरून तिच्याशी संपर्क साधता येऊ शकतो.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -