घरमुंबईसमुद्रकिनार्‍यांवर जेलीफिशची दहशत

समुद्रकिनार्‍यांवर जेलीफिशची दहशत

Subscribe

किनार्‍यांवर जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मुंबईकरांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत ५०हून अधिक मुंबईकरांना या जेलिफिशनी दंश केला आहे.

मुंबईतील समुद्र किनार्‍यांवर जेलीफिशचे आक्रमण झाले असून त्याचा फटका किनार्‍यांवर जाणार्‍यांना बसत आहे. २०१६ साली गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी बर्‍याच मुंबईकरांना जेलीफिशनी दंश केला होता. आताही किनार्‍यांवर जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मुंबईकरांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत ५०हून अधिक मुंबईकरांना या जेलिफिशनी दंश केला आहे. दादर, जुहू चौपाटीबरोबर आता अक्सा चौपाटीवरील ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशनी थैमान घातले आहे.

सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार आणि रविवार नेहमीप्रमाणे अक्सा बिचवर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी अनवाणी पायांनी पाण्यात उतरलेल्या तब्बल 50 जणांना ब्लू बॉटल जेलीफिशने दंश केला. जेलीफिशच्या दंशानंतर तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने अनेकांवर प्रथमोचार केले, तसेच त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. चौपाट्यांचा आनंद जरुर घ्या, पण त्यावेळी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच प्रत्येक समुद्र किनार्‍यावर याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करणारे माहिती फलक लावण्यात आले आहेत. अनवाणी पायाने समुद्रात न जाण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

तीन प्रकारचे जेलीफिश

समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनार्‍यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात.‘ब्लू बॉटल’ जेलीफिशचे शरीर दोन इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे असते, तसेच सात इंच दोरीसारखे पाय असतात. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून गाठ येते आणि असह्य वेदनाही होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -