कुर्ल्यातील पदपथांवरचा अतिक्रमणांचा विळखा सुटला!

Mumbai
encroachment action

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस असलेल्या स्टेशन रोड परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी महापालिकेच्या एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले. मुंबईत अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण हटवण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतर महापालिकेचे अधिकारी कामाला लागले आहेत. त्यामुळे कुर्ला पश्चिम येथील अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणांचा विळखा सोडवण्यात महापालिकेला यश आले.

मुंबईतील अनेक पदपथांवर अतिक्रमणे झाल्याने पादचार्‍यांना चालण्यास पदपथ नसून त्यांना रस्त्यांवरुन चालावे लागते. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पदपथांवरील अतिक्रमणे हटवून पादचार्‍यांना चालण्यास जागा मोकळी करून दिली जावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांनी उपायुक्त भरत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई हाती घेतली. यावेळी कुर्ला पश्चिम येथील स्टेशन रोडवरील पदपथ जी अतिक्रमण करुन अडवण्यात आली होती, त्यावर बुलडोझर चालवून ती मोकळी करण्यात आली. या ठिकाणी पदपथावर असलेल्या रेलिंग आणि रस्त्यावरही पथावरी पसरवून अतिक्रमण करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासूनचे हे अतिक्रमण असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे महापालिका अधिकार्‍यांच्या मनगटात मणभर मांस चढले आणि त्यांनी आता धडक कारवाई हाती घेतली आहे.

मराठा मंदिर मार्गही मोकळा

भायखळा ई विभागातील मराठा मंदिर येथील एकूण ६२ झोपड्यांवर महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत कार्यवाही करत त्या जमिनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे भायखळा येथील भारतीय रिझर्व्ह बँक क्वार्टर्समधील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या झोपडीत राहणार्‍या पात्र कुटुंबांचं मुकुंद नगर, म्हैसूर कॉलनी, मोनोरेल स्टेशन येथील प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात आलं आहे.