‘शक्य आहेत तीच कामं करा’, प्रविणसिंह परदेशींच्या अधिकार्‍यांना सूचना!

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच प्रवीणसिंह परदेशी यांनी लागलीच व्यवस्थापनात लक्ष घातलं असून कारभार अधिक पारदर्शी आणि वेगवान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Mumbai
Pravin Pardeshi
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी

महापालिकेच्या आयुक्तपदी असताना अजोय मेहता यांनी सुरु केलेल्या मासिक आढावा बैठकीची परंपरा प्रविणसिंह परदेशी यांनी पुढे आयुक्तपदाची सूत्रे हाती घेत कायम ठेवली आहे. मात्र, या आढावा बैठकीत, आयुक्तांनी जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्स्टसह इतर प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांना बोलावून अडचणींवर कशा प्रकारे मात करता येईल याचा विचार केला. आयुक्तांनी यावेळी, ‘मला दाखवण्यासाठी कोणती कामे हाती घेऊ नका. शक्य आहे तीच कामे करा, उगाच आवाक्याबाहेरच्या कामांना हात घालू नका तसेच कुठलीही आश्वासने देऊ नका’, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

पालिका ऑनलाईन@वर्क!

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुख, सहायक आयुक्त, उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांसोबत मासिक आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे महापालिकेच्या अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अशक्य असणार्‍या गोष्टी करण्याऐवजी शक्य असणार्‍या गोष्टी करण्याकडेच भर द्या, अशा प्रकारचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. ‘जे काही कराल, त्याची माहिती मला द्या’, असेही त्यांनी सांगितले. विभाग कार्यालय आणि मध्यवर्ती खाते यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अनेक पायाभूत विकास कामे तसेच प्रकल्प कामे रखडली जातात. त्यामुळे ‘यापुढे दोघांमध्ये समन्वय राखून निर्णय घेतले जावेत. कोणत्याही विकास कामांसाठी बैठक घेताना सबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन तिथल्या तिथेच निर्णय घेतले जावेत. जेणेकरून कागदपत्रांच्या मंजुरीला विलंब लागणार नाही. यासाठी खातेप्रमुखांकडे जावे लागले तरीही सहायक आयुक्तांनी जावे’, असेही निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने लोकांना तक्रारी करता याव्यात, यासाठी मुख्य ट्विटर अकाऊंटसह २४ विभाग कार्यालय तसेच खात्यांसाठी स्वतंत्र ट्विटर अकाऊंट्स उपलब्ध करून दिले आहेत. यावर आलेल्या सर्व तक्रारींचा आढावा आयुक्तांनी घेत, ज्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, त्या सर्वांशी व्यक्तीगत संपर्क साधून, त्यांच्या तक्रारीचे निराकरण झाले आहे, त्याबद्दल ते समाधानी आहेत, याचाही आढावा घेतला जावा, असे निर्देश दिल्याचे समजते.


हेही वाचा – नवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी यंच्यासमोर मुंबईतील हे मोठं आव्हान

ध्यानधारणा करत आयुक्तांची बैठकीला सुरुवात

महापालिका आयुक्तांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांमध्ये एकाग्रता निर्माण व्हावी, याकरता सुरुवातील सर्वांना ध्यानधारणा करायला लावली. तब्बल दहा मिनिटे ध्यानधारणा केल्यानंतर आयुक्तांनी आपल्या आढावा बैठकीला सुरुवात केली. त्यामुळे कोणत्याही मानसिक दबावाखाली अधिकारी वर्ग न राहता मोकळेपणाने आपले विषय मांडत होते. आयुक्तांनी केलेल्या या ध्यानधारणेचा चांगलाच प्रभाव अधिकार्‍यांवर दिसून आला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली बैठक संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत संपल्यानंतरही अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावरचा मोकळेपणा आणि बिनधास्तपणा लक्षात येण्यासारखा होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here