घरमुंबईपालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाची कारवाई; रस्ता झाला मोकळा!

पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाची कारवाई; रस्ता झाला मोकळा!

Subscribe

मुंबई महानगर पालिकेच्या जी दक्षिण विभागाने रस्त्यावर ट्रॅफिकला अडथळा ठरणारी ७ झाडं हटवली असून त्यामुळे या विभागातला ट्रॅफिकचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

दक्षिण मुंबईतील डिलाईल पूल पुनर्बांधकामासाठी बंद असणे आणि ‘मेट्रो’सह सुरु असलेल्या विविध विकास कामांमुळे वरळी, परळ आदी परिसरातील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला होता. या पार्श्वभूमीवर जी दक्षिण विभागातील वाहतुकीचा आढावा घेतला असता ४ महत्त्वाच्या मार्गांमध्येच असलेल्या झाडांचाही प्रतिकूल परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे निदर्शनास आले होते. हे लक्षात घेऊन, वृक्ष प्राधिकरण समितीच्या पूर्व परवानगीने वाहतुकीला अडथळा ठरणारी ७ झाडे रस्त्यावरून हटवण्यात आली आहेत. याच ७ झाडांपैकी सक्षम असणाऱ्या ३ झाडांचे ‘क्रेन’च्या सहाय्याने वरळी स्मशानभूमी परिसरात पुनर्रोपण देखील करण्यात आले आहे. तर उर्वरित ४ झाडे ही बाधित (Infected) होती. ही ७ झाडे हटविल्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

२ सक्षम झाडांचे वरळीतच पुनर्रोपण

महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान दीपक टॉकीज जवळ असणारी ना. म. जोशी मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी ४ झाडे हटविण्यात आली आहेत. याच झाडांपैकी २ सक्षम झाडांचे पुनर्रोपण वरळी स्मशानभूमी परिसरात करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ना. म. जोशी मार्गासह सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गोखले मार्ग इत्यादी मार्गांवरील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सरकारला झाडं लावण्यात नाही तर पोस्टरबाजीमध्ये रस’

…आणि ६० फुटी रस्ता झाला मोकळा!

याशिवाय ‘जी दक्षिण’ विभागातील अपोलो मिल कंपाऊंडजवळ असणाऱ्या ६० फुटी बोरीचा मार्गावर रस्त्यावरच असणाऱ्या ३ झाडांमुळे ६० फुटी रस्त्यापैकी केवळ २० फुटांचाच रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीला उपलब्ध होत होता. मात्र, आता ही झाडे हटवल्यामुळे हा ६० फुटी रस्ता प्रत्यक्षपणे वापरण्यात येण्यासह इतर लगतच्या मार्गांची वाहतूक देखील सुलभ होण्यास मदत होणार आहे.

शनिवारी हटवण्यात आलेल्या या ३ झाडांपैकी एका सक्षम झाडाचे पुनर्रोपण वरळी स्मशानभूमी परिसरातच करण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी २ क्रेन, २ जेसीबी आणि २ डंपर अशी साधनसामुग्री वापरण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -