घरCORONA UPDATEदुःखद घटना: कोरोना विरोधात लढणाऱ्या BMC वॉर्ड ऑफिसरचा कोरेानामुळे मृत्यू

दुःखद घटना: कोरोना विरोधात लढणाऱ्या BMC वॉर्ड ऑफिसरचा कोरेानामुळे मृत्यू

Subscribe

कोरोनामुळे अभियंता, उपायुक्त यांचे मृत्यू झालेले असतानाच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व अर्थात एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार (वय ५७) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. खैरनार यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. विशेष म्हणजे एच-पूर्व विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना खैरनार यांनी येथील संख्या नियंत्रणात आणत येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांपर्यंत नेण्यात यश मिळवले होते. तर येथील रुग्णवाढीचे प्रमाण हे शुन्य पूर्णांक पाच टक्के एवढ्यावर आणले होते. त्यामुळे एक यशस्वी सहायक आयुक्त म्हणून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांवर सोबत उपाययोजना राबवत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. खैरनार यांच्या रुपात पहिला सहायक आयुक्त महापालिकेने कोरोनामुळे गमावला आहे. त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे.

सुरुवातीच्या काळात वांद्रे बेहरामपाडा, भारत नगर आदी भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर खैरनार यांनी पोलिसांच्या मदतीने ड्रोन पध्दतीने येथील गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या ठिकाणी झोपडपट्टी भागांमध्ये पूर्ण लक्ष्य केंद्रीत करत येथील प्रत्येक सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन तसेच स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी स्टँडचा वापर करण्यास सुरुवात केले. त्यानंतर वांद्र्यातील कोरोना रुग्ण कमी होवून सांताक्रुझमध्ये वाढू लागल्यानंतर त्यांनी तेथीलही संख्या नियंत्रणात आणण्यात यश मिळवले होते.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानतंर तिथूनही त्यांना हलवून फोर्टीस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती फारच चिंताजनक होती. त्यांना प्लाझ्माही देण्यात आला होता. परंतु शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

अशोक खैरनार यांची महापालिकेतील वरिष्ठ सहायक अभियंता म्हणून सहायक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी दादर-माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी यशस्वी कामगिरी बजावली होती. तिथून त्यांची बदली एच-पूर्व विभागात झाली होती. मात्र, या विभागात त्यांनी आपला पुर्वानुभव पणाला लावून यशस्वी कामगिरी बजावलीच. शिवाय कोरेानाच्या कालावधीतही त्यांनी एच-पूर्व विभागातील कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्याची व्युहरचना रचत त्यांनी यशस्वी अंमलबजावणी करून दाखवली. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान हे याच एच-पूर्व विभागात आहेत.

- Advertisement -

यापूर्वी उपायुक्त शिरीष दिक्षित यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्यापूर्वी अनेक अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे २०० हून अधिक कर्मचारी,अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -