घरमुंबईमुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची भरती वादात

मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची भरती वादात

Subscribe

मुंबई महानगर पालिकेकडून राबवण्यात येत असलेली कनिष्ठ अभियंता पदांसाठीची भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे.

मुंबई महापालिकेत एकूण ३४१ कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेली ऑनलाईन भरती परीक्षा वादात अडकली असून आचारसंहितेच्या काळामध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आल्याने स्थायी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास किमान १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी स्थायी समितीने केली आहे. या मुदतवाढीसह अनेक मुद्यांचे निराकरण करण्याचे आदेश देत स्थायी समिती अध्यक्षांनी या ऑनलाईन भरतीसाठी आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव राखून ठेवला.

मुदत वाढवून देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील स्थापत्य (सिव्हील), यांत्रिक (मॅकेनिकल) आणि विद्युत (इलेक्ट्रीक) या संवर्गातील ३४१ कनिष्ठ अभियंता पदांसाठी जाहिरात प्रकाशित केल्यानंतर यासाठी ऑनलाईन अर्ज १२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मागवण्यात आले. ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर हे सर्व अर्ज स्वीकारणे, त्यांची छाननी करणे, त्यांची लेखी परिक्षा घेणे, त्यानंतर त्यांची गुणवत्ता यादी तयार करणे आदींच्या कामांसाठी नेमण्यात आलेल्या आय. बी. पी. एस. या संस्थेच्या नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणला होता. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवून झाल्यांनतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी येत आहे, हा खरं तर स्थायी समितीचा अवमानच आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू असताना म्हणजे १२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीतच हे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. त्यामुळे या भरतीची माहिती अनेक उमेदवारांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ दिवसांकरता वाढवावी, अशी मागणी राखी जाधव यांनी उपसूचनेद्वारे केली.

- Advertisement -

प्रस्ताव राखून ठेवला

त्यावर ऑनलाईनअर्ज करण्याचा कालावधी वाढवणे आवश्यक असून योग्य तो कालावधी वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा,अशी सूचना भाजपच्या प्रभाकर शिंदेंनी केली. तर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणताही अधिकारी समिती अध्यक्षांच्या दालनात यायला किंवा फोन उचलायला तयार होत नाही. मग ही भरती प्रक्रीया कशी राबवली? असा सवाल करत त्यांनी ही मुदतवाढ मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांनी केलेल्या उपसूचनेसह केलेल्या मागणीचा विचार करत सविस्तर निवेदन करण्याचे आदेश देत संबंधित प्रस्ताव राखून ठेवला.


हेही वाचा – युती तुटली तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच!

अशी होणार भरती

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ सिव्हील) : २४३
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत ) : ९८
परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवार : ४०० रुपये
परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग उमेदवार : ६०० रुपये
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता वय – ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवाराकरता वय – ४३ वर्षे


वाचा सविस्तर – मुंबई महापालिकेत मेगाभरती; ३४१ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -