मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारा’साठी शिक्षकांची नावे जाहिर

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक ५ सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०१९- २० च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज (दि.१३ नोव्हेंबर २०२०) दुपारी, दुसरा माळा, पेंग्विन इमारत, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, (राणीबाग), भायखळा (पूर्व) येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहिर केली.

शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत,त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन-१९७१ पासून ०२ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. तदनंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने“ गौरविण्यात येते. सदर वर्ष हे या पुरस्कार वितरणाचे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे.

महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी रु.१०,०००/- (ECS द्वारे ), मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
२२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत निवड समितीने शिक्षणाधिकारी कार्यालय, त्रिवेणी संगम मनपा शाळा इमारत, महादेव पालव मार्ग, करीरोड, मुंबई येथे १२३ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सन- २०१९-२० च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १२३ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सन २०१९-२० साठी पुरस्कार प्राप्त झालेले माध्ममनिहाय शिक्षकांच्या नावांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.