सार्वजनिक नवरात्रौत्सवाबाबत BMC कडून मार्गदर्शक सूचना जारी; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

गणेशोत्सवादरम्यान पालन केलेली कार्यपद्धती नवरात्रौत्सवात देखील लागू

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे तसेच राज्य शासनाद्वारे देखील मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व कार्यपद्धतीनुसार आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने मूर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी देण्याविषयी अधिक सुलभ कार्यपद्धती आणि ‘कोविड’ संदर्भातील हमीपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे.

तसेच सार्वजनिक मंडळांकरिता कमाल ४ फूट, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि सर्व मंडपांमध्ये निजंर्तुकीकरणाची व्यवस्था करण्यासह शारीरिक दूरीकरणाचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना आपले हात वारंवार साबणाने धुणे, सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’चा सुयोग्यप्रकारे वापर करणे आणि दोन व्यक्तिंमध्ये किमान २ मीटरचे अंतर राखणे; या ३ नियमांची आपापल्या स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शक सुचनांचे अत्यंत काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन संबंधित महापालिका उप आयुक्त श्री. हर्षद काळे यांनी नागरिकांना केले आहे.

मंडप परवानगीबाबत

गणेशोत्सवादरम्यान गणपती मूर्ती तयार करण्यासाठी उभारावयाचे तात्पुरते मंडप (मूर्तीकारांचे मंडप) उभारण्याबाबतच्या यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचना नवरात्र व अन्य उत्सवांदरम्यानही लागू राहणार आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२० साजरा करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना शासनाकडूनही प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने दिनांक ३० सप्टेंबर २०२० पासून मूर्तीकारांच्या मंडपांना विहित शुल्क आकारुन परवानगी देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.


Corona: गुजरातमध्ये यंदा नवरात्रीत गरबा-दांडियाचा जल्लोष नाही; गुजरात सरकारची नियमावली जाहीर