Lockdown: दादरच्या भाजीविक्रेत्यांवरील कारवाईत पालिका अधिकाऱ्यांचा दुजाभाव!

Mumbai
dadar vegetable vendors

दादर पश्चिम येथील घाऊक भाजीपाला मार्केट गर्दीमुळे जकात नाक्यांवर हलवण्यात आलं असलं तरी दादरमधील सेनापती बापट मार्ग आणि हॉकर्स प्लाझाच्या गल्लीत महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे घाऊक भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या घाऊक भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी न करणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करायला भाग पाडले जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मराठी तरुण शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करत किरकोळ विक्री करत आहे. मात्र, महापालिका घाऊक विक्रेत्यांना अभय देत या किरकोळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई करताना दिसत आहे.

माहिम आणि दादर परिसरामध्ये सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मराठी तरुण भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. परंतु महापालिकेचे अधिकारी या तरुणांना व्यवसाय करू देत नाहीत. या किरकोळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई करतानाच काहींना मात्र अभय देत आहेत. याबाबत माहिममधील तरुण भाजी विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, माहिममधील एकाच रस्त्यावर आम्ही तरुण भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावता यावेत आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारे दोहोचा विचार करत मी व्यवसाय करतो. परंतु माझ्यासह काही नेमक्या भाजी विक्रेत्यांवरच महापालिकेची गाडी कारवाई करते. तर इतरांना आधीच कल्पना देत त्यांच्यावरील कारवाई टाळली जाते.

मात्र, याबाबत त्याने दिलेली माहिती खूपच आश्चर्यजनक आहे. तो म्हणतो, मी शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करतो आणि ज्यांच्यावर कारवाई होते ते सर्व शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. परंतु जे दादरमधील घाऊक भाजी विक्रेत्यांकडून खरेदी करतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. कारण याची हमी घाऊक भाजी विक्रेते घेत असतात. विशेष म्हणजे दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर घाऊक भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे. तरीही महापालिका अधिकाऱ्यांच्या मर्जीतील काही विक्रेते हॉकर्स प्लाझाच्या गल्लीत घाऊक भाजीचा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करणारे हे फेरीवाल्यांचे प्रमुख म्होरक्या असून त्यांनीच हे व्यवसाय सुरु केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भाजी खरेदी न करणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेत्यांवर ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here