घरमुंबईमहापालिकेच्या खुल्या नाट्यगृहात घुमणार 'संगीताचे सूर'

महापालिकेच्या खुल्या नाट्यगृहात घुमणार ‘संगीताचे सूर’

Subscribe

मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये आता संगीताचे सूर ऐकायला मिळणार आहेत. महापालिकेच्या १६ उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये संगीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या खुल्या नाट्यगृहात आता संगीताचे सूर ऐकायला मिळणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी महापालिकेच्या १६ उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये संगीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता सुरु होणाऱ्या या संगीत सभांमध्ये ७५ पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधक आपली कला सादर करणार आहेत.

संगीताचे आयोजन

मुंबई महानगरपालिकेच्या २८ उद्यानांमध्ये खुली वर्तुळाकार नाट्यगृहे आहेत, तर अनेक ठिकाणी खुले मंच देखील आहेत. यापैकी १६ उद्यानांमध्ये येत्या शनिवारी सकाळी ७ वाजता संगीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या पुढाकाराने आणि ‘टेंडर रुट्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस’ आणि ‘बनयान ट्री’ या संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेल्या या संगीत सभांमध्ये उदयोन्मुख कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गायन आणि वादन कला सादर करणार आहेत.

- Advertisement -

मुंबई ‘ग्रीन रागा’ या शीर्षकांतर्गत आयोजित संगीत कला अविष्करणात गायनासह सारंगी, बासरी, तबला, संवादिनी,सितार, सरोद, संतूर यासारख्या विविध वाद्यांचे वादन देखील असणार आहे. महापालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने १६ उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणारे हे कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क असणार आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या उद्यानांमध्ये या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कलाकारांना त्यांच्या कला सहजपणे सादर करता याव्यात, यासाठी काही उद्यानांमध्ये वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत. या ठिकाणी रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था देखील आहे. या आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या असून रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पायऱ्यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अनेक उद्यानांमध्ये खुले मंच किंवा चबुतरे देखील आहेत.

या ठिकाणी लुटता येणार संगीताचा आनंद

  • टाटा उद्यान – ब्रीचकँडी रुग्णालयाजवळ
  • जोसेफ बाप्टिस्टा उद्यान – माझगांव
  • आदि शंकराचार्य उद्यान – पोलीस कॉलनी वरळी;
  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब केशव ठाकरे मनोरंजन मैदान – प्रकाश कॉटन मील जवळ, लोअर परेल
  • वीररत्न बाजीप्रभू उद्यान – शिवाजी पार्कजवळ दादर(प)
  • जॉगर्स पार्क – वांद्रे किल्ल्याजवळील उद्यान, कार्टर रोड, वांद्रे (प)
  • रावसाहेब पटवर्धन उद्यान – लिकिंग रोड, वांद्रे (प)
  • लायन्स जुहू मुलांचे पालिका उद्यान – सांताक्रुझ (प)
  • वीर सावरकर मनोरंजन मैदान – मालाड (प)
  • मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम – जोगेश्वरी पूर्व
  • किशोर कुमार बाग – म्हाडा कॉलनी, अंधेरी (प)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान – बोरिवली (प)
  • ड्रीम पार्क जवळील उद्यान -ठाकूर विलेज, कांदिवली (पू)
  • मारुती मंदिर मैदान, मारुती नगर, दहिसर (प)
  • सी. डी. देशमुख उद्यान, मुलुंड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -