घरमुंबईमुंबई महापालिकेत लिपिकांची मेगा भरती रद्द?

मुंबई महापालिकेत लिपिकांची मेगा भरती रद्द?

Subscribe

मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येणारी लिपिक पदाची भरती तूर्तास स्थगित करण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.

चतुर्थ श्रेणीतील कामगार, कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता मुंबई महापालिकेत ८१० लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाची मेगा भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता प्रशासन ही भरती तूर्तास स्थगित करण्याच्या विचारात आहे. ही भरती तूर्तास रद्द करून आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच याचा विचार केला जावा, असे निर्देश आयुक्तांनीच दिल्यानंतर स्थायी समितीच्या पटलावर ठेवलेला भरती परीक्षेचा हा प्रस्ताव मागे घेण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. मुंबई महापालिकेतील ८१० कार्यकारी सहायकांच्या रिक्तपदांची भरती ऑनलाईन परीक्षा घेऊन करण्यासाठी महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

प्रस्ताव राखून ठेवण्यात आला

महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षेसाठी अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख ८३ हजार ५५० रुपये एवढा येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया करण्यासाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेला प्रस्ताव मागे घेण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी केली. परंतु तोपर्यंत हा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवला.

- Advertisement -

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्पाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आयुक्तांनी लिपिक पदाची भरती करू नये. या भरतीमुळे आस्थापना खर्च वाढेल. सध्या महापालिकेची परिस्थिती पाहता, आस्थापना खर्च वाढणे महापालिकेच्या हिताचे नाही. त्यामुळे ही भरती तूर्तास स्थगित करावी आणि स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीला पाठवलेला प्रस्ताव मागे घेण्यात यावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने नव्याने ८१० रिक्त पदे भरणे, तसेच खात्यांतर्गत ८६४ कार्यकारी सहायकपदी बढती देणे, असे दोन्ही प्रस्ताव मागे घेण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे. मात्र, आयुक्तांनी हा प्रस्ताव मागे घेण्याची सूचना केली असली तरी स्थायी समितीत हा प्रस्ताव राखून ठेवल्यामुळे पुढील बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.


वाचा सविस्तर – मुंबई महापालिकेत मेगा भरती; लवकरच होणार ऑनलाईन परीक्षा

2 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -