घरमुंबईमुंबईत डेंग्यूचे अड्डे ठरू पाहणारे ८ हजार टायर्स जप्त!

मुंबईत डेंग्यूचे अड्डे ठरू पाहणारे ८ हजार टायर्स जप्त!

Subscribe

पावसाळ्यात डेंगीचा धोका वाढल्यामुळे डेंगीच्या अळ्या साचू शकतील आणि अंडी टाकू शकतील अशी ८ हजारांहून अधिक टायर्स मुंबई महानगर पालिकेने गेल्या ६ महिन्यांत जप्त केली आहेत.

मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणार्‍या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने मिशन डेंगी ऑपरेशनची हाती घेतले आहे. त्यानुसार मागील साडेसहा महिन्यांमध्ये ८ हजार ७२९ टायर्स हटविले असून २ लाख ८४ हजार १३९ एवढ्या छोट्या आणि मोठ्या पाणी साचू शकणार्‍या इतर वस्तूही हटवल्या आहेत. डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडीस इजिप्टाय’ (एडिस इजिप्ति) डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या बाबतीत मलेरियाचे परजीवी पसरविणाऱ्या ‘अॅनॉफिलीस स्टीफेन्सी’ डासाची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात आणि घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंगी आणि मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून येतात. हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या आणि कार्यालयाच्या परिसराभोवती पाणी साचू शकेल अशी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिकेच्या किटकनाशक विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

डास टाळण्यासाठी काय करावे?

अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंगी आजार पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरता हे पिंप आणि इतर पाणी साठवण्यची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी पाण्याचे पिंप वा पाणी साठवण्याची इतर भांडी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरड्या आणि स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी कोरड्या आणि स्वच्छ कापडाने पुसत असताना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात तपासणी करुन टायर्स आणि पाणी साचतील अशा इतर वस्तू शोधून हटवण्यात येत असतात.

- Advertisement -

तुम्हाला हे माहिती आहे का? – २०१८ डेंग्यू, मलेरियाचं, राज्यात सर्वाधिक मृत्यू

सर्वाधिक टायर्सची जप्ती परळ, शिवडी, लालबागमध्ये

महापालिकेने १ जानेवारी ते २० जुलै २०१९ या सुमारे साडे सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाहीत ‘एफ दक्षिण’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८८४ टायर्स हटवण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल ’एम पूर्व’ विभागातून ५८६ आणि ’के पूर्व’ विभागातून ५६९ टायर्स हटवण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून एकूण ८ हजार ७२९ टायर्स हटवण्यात आले आहेत.

भायखळ्यात सर्वाधिक वस्तूंची विल्हेवाट

टायर्स व्यतिरिक्त पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, अशा इतर वस्तू देखील महापालिकेद्वारे हटवण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. याअंतर्गत १ जानेवारी ते २० जुलै २०१९ या कालावधीदरम्यान सर्वाधिक म्हणजे ५१ हजार ५३४ वस्तू महापालिकेच्या भायखळा ’ई’ विभागातून हटवण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल २३ हजार ९९० वस्तू बोरीवली ‘आर मध्य’ विभागातून, तर २२ हजार ३७८ वस्तू या ’ए’ विभागातून हटवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व २४ विभागातून २ लाख ८४ हजार १३९ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत, अशीही माहिती नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

चमचाभर पाण्यातही डेंगी डासाच्या अंडी

आपल्या सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा नियमितपणे तपासणी करुन तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करुन घेणे, पाणी साचलेले आढळून आल्यास ते काढून टाकणे वा नष्ट करणे, अत्यंत आवश्यक आहे. साचलेल्या काही थेंब पाण्यातही डास अंडी घालतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी देखील विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य तितक्या लवकर नष्ट करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.


हेही वाचा – राज्यात दरवर्षी ३ लाखांहून अधिक रुग्णांना होतो डेंग्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -