घरमुंबईपालिकेची खर्चिक सुरक्षा; खासगी सुरक्षेवर ३.५ कोटींचा खर्च!

पालिकेची खर्चिक सुरक्षा; खासगी सुरक्षेवर ३.५ कोटींचा खर्च!

Subscribe

महानगर पालिकेकडून खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेवर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा खर्च होत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे इतकी महागडी सुरक्षा घेऊन देखील पालिकेच्या अनेक इमारतींच्या ठिकाणी सुरक्षा रामभरोसेच असल्याचं पाहायला मिळत आहे.

एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतींच्या सुरक्षेसाठी महापालिकेला महिन्याला दीड कोटी रुपयांचा खर्च येत आहे. प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून महापालिकेने खासगी सुरक्षा रक्षकांना तैनात केले असले, तरीही याठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होतच आहे. याशिवाय विविध रुग्णालये, प्रसुतीगृहे आणि अग्निशमन दल आदी ठिकाणीही खासगी सुरक्षा कंपनीची मदत घेतली जात आहे. यासाठीही मासिक दोन कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खासगी सुरक्षा कंपन्यांवर महिन्याला साडेतीन कोटी रुपये खर्च होत असून प्रत्यक्षात या खासगी सुरक्षा रक्षकांची कोणतीही मदत महापालिकेला होत नसल्याची बाब समोर येत आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या इमारतींवर ५० कोटींचा खर्च

गोवंडी, देवनार, चेंबूर आदी विभागात प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारती महापालिकेने २०१२पासून ताब्यात घेतल्या आहेत. या इमारतींमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार एमएमआरडीएने नियुक्त केलेली सुरक्षा व्यवस्था त्याच दर आणि अटींवर पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१५मध्ये पुन्हा निविदा मागवून महापालिकेने कमी बोली लावणार्‍या ईगल सिक्युरिटी अ‍ॅण्ड पर्सोनल सर्व्हिसेस या कंपनीला १ डिसेंबर २०१५पासून ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत कंत्राट दिले होते. परंतु याची मुदत संपुष्टात आल्यानंतर चार महिन्यांकरता त्यांना मुदत वाढ देण्यात आली होती. यामध्ये ९२५ सुरक्षा मदतनीस आणि ३० पर्यवेक्षक यासाठी मासिक १ कोटी ४० लाख ५८ हजार ४५ रुपये एवढा खर्च वेतनावर होतो. त्यामुळे दर महिन्याला ५ कोटी ८२ लाख ३२ हजार १८० रुपयांचे कंत्राट वाढवून दिले होते. त्यामुळे आतापर्यंत साडे तीन वर्षांत या सुरक्षा व्यवस्थेवर सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शहराचं सोडा, महापालिका मुख्यालयातच पाणीटंचाई!

पालिकेच्या इमारतींवर २० महिन्यांत १३९ कोटी खर्च!

मुंबई महापालिकेची विविध रुग्णालये, प्रसुतीगृहे, अग्निशमन केंद्र तसेच एमएमआरडीएकडून ताब्यात घेतलेल्या इमारती आणि महत्वाच्या कामाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त केले असून या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर महिन्याला १ कोटी ९४ लाख रुपये खर्च होत आहे. या सर्व ठिकाणी ११२४ सुरक्षा मदतनीस ३० पर्यवेक्षक, १० असाईनमेंट ऑफिसर, ११ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, एक्स रे बॅगेज स्कॅनिंग मशिन दोन, वॉकी टॉकी ४५, अंडर व्हेईकल सर्चिंग मिरर ६ आणि ५८ रिसेप्शनिस्ट अशी सेवा घेतली जात आहे. यासाठी १ जुलै २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी नेमलेल्या या सुरक्षा कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर पुढील आठ महिन्यांसाठी १५.५८ कोटींचे वाढीव कंत्राट ईगल सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे २० महिन्यांच्या कालावधीत या खासगी सुरक्षा कंपनीवर १३९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -