घरताज्या घडामोडीशीव रुग्णालयाच्या कंत्राट कामाला स्थायी समितीची मंजुरी

शीव रुग्णालयाच्या कंत्राट कामाला स्थायी समितीची मंजुरी

Subscribe

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासात बांधल्या जाणाऱ्या तीन इमारतींच्या कंत्राट कामांना शुक्रवारी स्थायी समितीने मान्यता दिली. या कंत्राट कामांचा यापूर्वीचा प्रस्ताव रद्द झालेला नाही. तसेच यासाठी मागवलेल्या फेरनिविदेत पहिल्या निविदेत पात्र ठरलेल्या एकमेव कंत्राटदाराने भाग घेतला होता. त्यातच मागील पेक्षा ५० कोटी रुपये अधिक रक्कम द्यावी लागणार होती. त्यामुळे या कंत्राट कामाला भाजपने तीव्र विरोध करत फेरनिविदा मागवण्याची मागणी केली. परंतु ही मागणी फेटाळून लावत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव संमत केला. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शीव रुग्णालयाच्या विस्तारीत रुग्णालयाच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या मागील बाजुस तळ अधिक २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकार्‍यांसाठी निवासस्थान इमारत बांधणे, रुग्णालयाच्या अखत्यारित बराक  प्लॉटवर तळ अधिक १९ मजल्याची महापालिकेच्या उपयोगाकरता व कर्मचारी निवास्थानाची इमारत बांधणे तसेच याच ठिकाणी तळ अधिक २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, याशिवाय तळ अधिक ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत आदींच्या बांधकामांसाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोशिएटस आदींनी बनवलेल्या आराखड्यानुसार निविदा मागवल्या होत्या. यामध्ये अहलुवालिया कॉन्ट्क्ट (इंडिया) या कंपनी पात्र ठरली.

- Advertisement -

या कंपनीला विविध करांसह ६७२ कोटी रुपयांना कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. परंतु वाटाघाटीत या कंपनीने ८.४९ टक्क्यांच्या खाली दर कमी करुन देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाने आधीचा प्रस्ताव संमत असताना तो रद्द करून नव्याने निविदा मागवली. यामध्ये हीच एकमेव कंपनी पात्र ठरली. त्यांना ७३३ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे मागील निविदेपेक्षा  ५० कोटींची वाढ झाली होती. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव मागील दोन वेळा राखून ठेवला होता. परंतु शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी हा प्रस्ताव परत पाठवून याची फेरनिविदा मागवण्यात यावी अशी मागणी केली. हा एकमेव कंत्राटदार असल्याने याची फेरनिविदा मागवावी अशी मागणी त्यांनी केली होती.

यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यापूर्वी दोन वेळा निविदा काढलेली असून जर अशाप्रकारे निविदा काढूनही एकमेव निविदाकार असेल तर त्या कंपनीला काम देण्याचा नियम आयुक्तांना आहे. त्यानुसार हा प्रस्ताव आला आहे. तसेच याचा मूळ प्रस्ताव यापूर्वी मंजूर केला होता तर मग याला विरोध का असा सवाल करत हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे शीव रुग्णालयाच्या विस्तारीत रुगणालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -