घरमुंबईमुंबईतील सर्व मॉल्सचे फायर ऑडिट करा, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश!

मुंबईतील सर्व मॉल्सचे फायर ऑडिट करा, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश!

Subscribe

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेबाबत स्थायी समितीत पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. मागील बैठकीत समितीने दिलेल्या निर्देशानंतर योग्य प्रकारची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने सादर करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व मॉल्सची तपासणी करून त्याबाबत इमारत प्रस्ताव व इमारत कारखाना यांचा अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्यात यावा, असे निर्देश समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मागील बैठकीत हरकतीच्या मुद्द्यादवा्रे या आगीची चौकशी अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर करून त्याचा अहवाल समितीच्या पटलावर १५ दिवसांमध्ये ठेवण्याची मागणी केली होती. परंतु, याबाबत बुधवारी झालेल्या सभेपुढे प्रशासनाने सदस्यांच्या मागणीनुसार योग्य ती माहिती न देता समितीची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सदस्यांनी विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने ही माहिती नसल्याची बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनीही अपूर्ण माहितीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या अनुषंगाने समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व मॉल्सचे अग्निसुरक्षेच्या माध्यमातून ऑडिट करण्यात यावे असे निर्देश देत इमारत प्रस्ताव व इमारत कारखाना यांची मदत घेवून हे ऑडीट व्हावे. तसेच समितीला सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याने याचा एकत्रित अहवाल सादर केला जावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

- Advertisement -

सिटी मॉलची आग सदोष विद्युत केबल्समुळेच!

सिटी मॉलमधील आग ही अग्निशमन दलाच्या तपासणीमध्ये सदोष विद्युत प्रणालीमुळेच लागल्याचे आढळून आले आहे. तसेच  या मॉल्समध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत त्याकरता महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक अधिनियमांतर्गत येथील  विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -