पालिकेच्याही इंटर्न डॉक्टरांना आता मिळणार ११ हजार विद्यावेतन!

Mumbai
Private Doctor
प्रातिनिधीक फोटो

महापालिकेच्या वैद्यकीय कॉलेजमधील आंतरवासित (इंटर्न) विद्यार्थ्यांना आता दरमहा ११ हजार विद्यावेतन मिळणार आहे. तसेच कोविडमध्ये काम करण्यासाठी त्यांना एप्रिलपासून ३९ हजार अतिरिक्त मानधन देण्यात येणार आहे. पालिका कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०१९ पासूनचे विद्यावेतन मिळणार असून त्यांना लवकरच थकबाकी पालिकेकडून देण्यात येणार आहे. आंतरवासिता विद्यार्थ्यांचे वेतन राज्यसरकारने वाढवून ११ हजार रुपये केल्याचे सप्टेंबर २०१९ मध्ये शासन निर्णयाद्वारे जाहीर केले. त्यानंतर राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हे वाढीव वेतन दरमहिन्याला प्राप्त होत आहे.

मात्र, याला आता आठ महिने उलटत आले तरी पालिकेने अद्याप वाढीव वेतन लागू केलेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०१९ पासून ११ हजार विद्यावेतन मिळत असताना पालिकेच्या वैद्यकीय कॉलेजमधील इंटर्न विद्यार्थ्यांना मात्र ६ हजार विद्यावेतन मिळत होते. यासंदर्भात अस्मि या इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेने पालिका आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर महापालिकेने विद्यार्थ्यांना ११ हजार विद्यावेतन लागू करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन सप्टेंबर २०१९ पासून लागू होणार आहे. तसेच सध्या हे सर्व विद्यार्थी कोविड ८ ते १० तास काम करत आहेत. पण त्यांना अवघे ६०० रुपये मानधन देण्यात येत होते. यासंदर्भातही अस्मिने पाठपुरावा केल्याने १ एप्रिलपासून त्यांना ३९ हजार आणि विद्यावेतन ११ हजार असे ५० हजार देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती अस्मि या इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष वेदकुमार घंताजी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here