Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता; पर्यायी वनीकरणासाठी १.४४ कोटींचा खर्च

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता; पर्यायी वनीकरणासाठी १.४४ कोटींचा खर्च

Related Story

- Advertisement -

पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे काम हाती घेतले आहे. या गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या अंतर्गत फिल्मसिटी – गोरेगाव ते अमरनगर – मुलुंड या दरम्यान असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ४.७० किमी लांबीचे दोन बोगदे जाणार आहेत. त्यामुळे जे वनीकरण नष्ट होणार आहे. त्याबदल्यात चंद्रपूर जिल्ह्यात पर्यायी वनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेला तब्बल १ कोटी ४४ लाख रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पर्यायी वनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची लांबी १२.२ किमी इतकी आहे. त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली प्रस्तावित भूमीगत बोगद्याची लांबी ४.७० किमी इतकी असणारा आहे. तसेच, गोरेगाव फिल्मसिटमधील प्रस्तावित कट आणि कव्हर भुयारी मार्गाची लांबी १.०२ किमी इतकी असणार आहे.

- Advertisement -

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पास वन विभागाच्या परवानगीसाठी प्रादेशिक अधिकारीत समितीची बैठक २९ मार्च २०१९ रोजी पार पडली. त्यात प्रस्तावित बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जात असल्याने १९.४३ हेक्टर पर्यायी व सदर जागेवरील पर्यायी वनीकरणाचा खर्च संस्थेने जमा करावा, अशी अट समाविष्ट करण्यात आलेली आहे.

त्यानुसार पर्यायी वनीकरणासाठी १९.५० हेक्टर जागा ताडोबा – अंधारी – व्याघ्र पटकल्पालगत मौजे वासनविहिरा व मौजें गोंडमोहाडी, तालुका – चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे खासगी जमीन खरेदी करून महाराष्ट्र शासन वनविभागाच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली आहे. आता सदर ठिकाणी पर्यायी वनीकरण करावयाचे आहे. त्यासाठी खर्च येणारी १.४४ कोटी रुपये रक्कम पालिकेने राज्य शासनाच्या वन विभागाकडे सुपूर्द करावी, असे सदर प्रस्तावात म्हटले आहे.

- Advertisement -