घरमुंबईआता भटक्या, पाळीव प्राण्यांवर पालिकेतर्फे केले जाणार वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार!

आता भटक्या, पाळीव प्राण्यांवर पालिकेतर्फे केले जाणार वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार!

Subscribe

मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना जीवनावश्यक शिक्षण, पाणी, आरोग्य, रस्ते, पर्यावरण आदींबाबतच्या विविध सेवासुविधा दिल्या जात आहेत. मानवी मृतदेहांवर स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता मुंबईत भटक्या व पाळीव प्राण्यांच्या आजारपणावर उपचार करणे आणि मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणे या सुविधा प्रथमच मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया आणि कामे पालिकेने नव्याने स्थापन केलेल्या ‘पशु वैद्यकीय आरोग्य विभागा’मार्फत सुरू करण्यात आली आहेत. या सर्व कामांसाठी पालिकेकडून १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशु वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख अधिकारी आणि देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या मृतदेहाचे दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत सध्या परळ येथे पाळीव प्राण्यांसाठी खासगी संस्थेच्या मार्फत एक खाजगी अंत्यसंस्कार केंद्र कार्यरत आहे. तसेच, बोरिवली येथील कोराकेंद्रात भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट एका सामाजिक संस्थेतर्फे लावण्यात येत आहे. मात्र, प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारी पालिकेची स्वतःची अशी एकही यंत्रणा नाही.

- Advertisement -

PNG आधारित दहनभट्टी

मुंबईत वाढत्या शहरीकरणाबरोबर लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या १.५० कोटी आहे. त्याचबरोबर पाळीव आणि भटक्या कुत्रे, मांजरी यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अनेक ठिकाणी मोकाट गाढवं, गायी यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मात्र ही भटकी पाळीव कुत्री, मांजरी, मोकाट गाढवं, गायी यांचा भर रस्त्यात, सर्वजनिक ठिकाणी इमारतीत, चाळीत कुठेही मृत्यू झाला तर त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जात नाहीत. अनेकदा हे मृत प्राणी उघड्यावर पडलेले दिसतात. त्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने दहन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य विभामार्फत महालक्ष्मी, मालाड, देवनार येथे दहनभट्टीची व्यवस्था करण्यात येत आहे.

श्रद्धांजली वाहण्यासाठी खास सुविधा

एखाद्या सोसायटीत, चाळीत, कुटुंबात आवडता कुत्रा, कुत्री, मांजर असे प्राणी असतात. दुर्दैवाने त्यांचा आजारपणात अथवा अपघातात मृत्यू झाला तर त्याला कुटुंबातील एक सदस्य म्हणून ज्यांनी जीव लावला, लळा लावला त्यांना त्या प्राण्यांच्या मृत्यूमुळे अतीव दुःख होते. अशा पाळीव प्राण्यांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा असल्यास त्यासाठी प्रार्थना कक्षही या प्राण्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिका पशु वैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख योगेश शेट्ये यांनी दिली आहे.

- Advertisement -

अशा असणार दहनभट्ट्या

पालिकेच्या मालाड येथील गुरांचा कोंडवाडा आणि महालक्ष्मी येथे प्रत्येकी ताशी ५० किलो व देवनार येथे ताशी ५०० किलो एवढ्या क्षमतेच्या पीएनजी गॅसवर आधारित दहनभट्ट्या बसवण्यात येणार आहेत. यासाठी मेड इन युकेच्या दोन मशीन खरेदी करण्यात येणार असून त्यांची किंमत १२ कोटी रुपये आहे. या दहनभट्ट्यांचा पुरवठा, उभारणी, चाचणी घेऊन बसवल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी मे. अनिथा टेक्सकॉट (इंडिया) कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दहनभट्ट्या पर्यावरणपूरक असणार आहेत. सध्या एक दहनभट्टी मालाड येथे तर दुसरी दहनभट्टी देवनार येथे बसवण्यात येणार आहे. तिसरी दहनभट्टी टाटा ट्रस्ट महालक्ष्मी येथे स्वतः स्वखर्चाने बसवणार आहे. दहनभट्टीत मृत प्राण्यांचे दहन केल्यानंतर कोणताही उग्र वास, दुर्गंधी वा काळा धूर हवेत पसरणार नाही. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असे योगेश शेट्ये यांनी सांगितले.

सध्या, सिव्हिल वर्क सुरू आहे. एकदा फाऊंडेशनचे काम झाले की, त्यानंतर मशिन बसविण्यात येतील. तोपर्यंत दहनभट्टीवरील छप्पर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, एमपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार याठिकाणी एक चिमणी उभारण्यात येणार असून पोल्यूशन कंट्रोल सिस्टीम देखील असणार आहे.

टाटा ट्रस्टचा प्रकल्पासाठी पुढाकार

टाटा ट्रस्ट ही सेवाभावी संस्था प्राण्यांना वैद्यकीय सेवासुविधा देणार आहे. टाटा ट्रस्ट व महापालिका यांच्यातील करारानुसार महालक्ष्मी श्वान नियंत्रण कक्ष कार्यालयाच्या जागेमध्ये टाटा ट्रस्टमार्फत प्राण्यांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या ट्रस्टमार्फत तेथे प्राण्यांसाठी दहनभट्टीही उभारली जाणार आहे. महापालिकेच्या जागेत टाटाकडून भटके पाळीव पशु, प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर पाच मजली भव्य असे रुग्णालय दीड वर्षात उभारण्यात येणार आहे.

भारतातील हे एकमेव आणि प्राण्यांसाठी प्रशस्त असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टाटाला रुग्णालय उभारण्यासाठी बीओटी तत्वावर पुढील ३० वर्षांसाठी जागा देण्यात येणार आहे. या ठिकाणी भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर आर्थिक मागास वर्गातील लोकांना पाळीव प्राण्यांकरता सवलतीच्या दरात उपचार देण्यात येणार आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या सबल घटकांच्या पाळीव प्राण्यांसाठी नियमित शुल्क आकारण्यात येणार आहेत.

अद्यावत यंत्रणा

महालक्ष्मी येथील टाटा व पालिका यांच्यातर्फे संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात प्राण्यांवर वैद्यकीय उपचार करताना सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्सरे आदी सर्व सुविधा असणार आहेत. त्यामुळे मुंबईतील पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी हे रुग्णालय जीवनदान देणारे ठरणार आहे.

या रुग्णालयाचे मिळणारे उत्पन्न टाटा ट्रस्टला मिळणार आहे. कारण रुग्णालयाचा संपूर्ण खर्च टाटा ट्रस्ट करणार आहे. पालिकेला एक रुपायाही खर्च करावा लागणार नाही. या रुग्णालयात जी तीन सदस्यीय डायरेक्टर टीम असेल, त्यामध्ये पालिकेतर्फे माझा समावेश असणार आहे, असे योगेश शेट्ये यांनी सांगितले.

मालाड कोंडवाडा कात टाकणार

मुंबई महापालिकेच्या मालाड येथील कोंडवाड्यात रस्त्यावरून पकडण्यात आलेल्या गायी, गुरे आदी भटक्या जनावरांना ठेवण्यात येते. मात्र या नवीन वर्षात मालाड कोंडवाडा कात टाकणार आहे. प्राणी कल्याण कायद्यानुसार या कोंडवाड्याचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. याबाबतच्या कामाची टेंडर प्रक्रिया झालेली आहे. या ठिकाणी सध्या वेगळे वाडे असून त्यात पकडलेल्या किमान ७० ते ८० भटक्या जनावरांना सुरक्षितपणे ठेवण्यात येत आहे. मात्र या जागेचा पुनर्विकास झाल्यावर किमान १५० जनावरे ठेवता येतील एवढी क्षमता वाढविण्यात येणार आहे. नर – मादी यांच्यासाठी वेगळे वाडे असणार आहेत. तसेच, प्राण्यांच्या पिल्लांसाठीही वाडे असणार आहेत. आजारी जनावरांसाठी वेगळे वाडे असणार आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.

Malad Kondwada
मालाड कोंडवाडा कात टाकणार!

तसेच, या ठिकाणी वाडे, गोशाळा, तेथील जनावरे पाहण्याची संधी शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे. प्राण्यांचे राहणीमान कसे असते, त्यांचा आहार, विहार, दिनचर्या याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -