सोमवारपासून मुंबई महापालिकेत पुन्हा बायोमेट्रीक हजेरी!

Mumbai
bmc bio metric attendance

कोरोना कोविड १९चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रीक हजेरी मुंबई महापालिकेत बंधनकारक केली जाणार आहे. पुढील सोमवारपासून महापालिकेत बायोमेट्रीक हजेरीच्या नोंदीसह कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीही बंधनकारक करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासनाच्या वतीने लवकरच जारी होणार आहे.

कोरेानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती गृहीत धरून एक दिवसाआड याप्रमाणे कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची सवलत दिली होती. परंतु २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचारी घरीच होते. परंतु त्या आधीपासून कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद केली होती. पण लॉकडाऊनच्या दोन महिन्यांनंतर महापालिकेने अत्यावश्यक सेवांसह इतर कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असेल त्यांनाच पूर्ण पगार आणि त्याखालील उपस्थिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपस्थिती दिवसांप्रमाणेच पगार दिला जाईल असा निर्णय घेतला गेला.

बायोमेट्रिक यंत्रे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना

त्यानंतर पुन्हा सुधारीत परिपत्रक काढून प्रशासनाने ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. परंतु त्यानंतरही कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रशासनाने ७२ तासांमध्ये कामावर उपस्थित राहा, अन्यथा बडतर्फ केले जाईल, असे फर्मान जारी केले. त्यामुळे बहुतांशी कर्मचारी कामावर परतले. पण आता त्यानंतर सामान्य प्रशासनाने १०० टक्के उपस्थितीचे सुधारीत परिपत्रक जारी करताना या उपस्थितीबरोबरच बायोमेट्रिक हजेरीही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिपत्रकावर महापालिका अतिरिक्त आयुक्त जयस्वाल आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाणार आहे. यासाठी सर्व बायोमेट्रिक हजेरीची यंत्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग प्रमुखांना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वी बायोमेट्रिक मशिनद्वारे हजेरी नोंदवण्यास बंदी घातली असली तरी आता सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या आजाराबाबत कोणत्या प्रकारे काळजी घेतली जावी, याची कल्पना आहे. तसेच बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. हजेरी बुकावर स्वाक्षरी करून अशाप्रकारे अनेक गैरहजर कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदवण्याचे प्रकार घडल्याने बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. पश्चिम रेल्वे ची विरारपासुन धीम्या गाड्या दर अर्धा तासाला चालू करण्यात याव्यात जेणेकरून बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी सुलभता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here