घरमुंबईअविघटनशील कचर्‍यावरही प्रक्रिया, प्रायोगिक तत्वावर प्रक्रिया केंद्र

अविघटनशील कचर्‍यावरही प्रक्रिया, प्रायोगिक तत्वावर प्रक्रिया केंद्र

Subscribe

अविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

मुंबईतील ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती तसेच कचर्‍यातील प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून कचर्‍याची विल्हेवाट लावली जात असली तरी अविघटनशील कचर्‍याच्या विल्हेवाटीची मोठी समस्या महापालिकेपुढे आहे. त्यामुळे अविघटनशील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मुंबईत दरदिवशी सुमारे ६८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे ५००० मेट्रिक टन कचर्‍यावर कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. तर देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पारंपारिक पद्धतीने १८०० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येतात. मात्र एकूण कचर्‍यापैकी नागरी कचर्‍यात असलेल्या अविघटनशील, रासायनिक किंवा जैविकरित्या अपायकारक नसलेल्या व ज्याचे पुनर्चक्रीकरण करता येणे शक्य नाही, अशा घटकांची शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया करताना १० टक्केच कचर्‍यावर प्रक्रिया करता येते.

४ मेट्रिक टनाची एकूण ३ प्रक्रिया केंद्र

मुंबईमध्ये सध्या ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती केली जाते, तर सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावताना प्लास्टिक वस्तूंवर पुनर्प्रक्रिया केली जाते. मात्र, ज्या वस्तूंवर प्रक्रिया करता येत नाही, अशा अविघटनशील वस्तूंच्या कचर्‍याच्या विल्हेवाटीची प्रमुख समस्या महापालिकेपुढे आहे. अशा प्रकारच्या अविघटनशील कचर्‍याची विल्हेवाट प्लाझ्मा तंत्रज्ञानाच्या आधारे करून त्या कचर्‍यापासून राख बनवली जाते. त्यामुळे अविघटनशील कचर्‍याची विल्हेवाट लावणे शक्य असल्याने महापालिकेने ४ मेट्रिक टनाची एकूण ३ प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रिया केंद्रांसाठी विल्हेवाटी संचाचा पुरवठा करण्यासह एक वर्षाच्या देखभालीसाठी प्रायोगिक तत्वावर शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारीत यंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी हिंदुस्थान इंजिनिअरिंग कंपनीची निवड करून तीन यंत्रांच्या उभारणीसाठी एकूण ६ कोटी ८६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

- Advertisement -

प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त अशोक खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, अविघटनशील कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी प्लाझ्मा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. त्यामुळे या तंत्राचा वापर सध्या प्रायोगिक तत्वावर तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येकी ४ मेट्रिक टनाचे कचरा प्रक्रिया केंद्र असून यामध्ये कचरा विल्हेवाटीनंतरही जो अविघटनशील कचरा शिल्लक राहतो, त्या कचर्‍यावर केंद्रावर प्रक्रिया करून त्यांची पूर्णपणे विल्हेवाट लावली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -