एस आणि टी प्रभाग समितीत भाजपला मोठा झटका; संख्याबळ असूनही सेनेकडे अध्यक्षपद!

एस आणि टी ही प्रभाग समिती आतापर्यंत भाजपच्या ताब्यात होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेनेला जाऊन मिळाल्याने या प्रभागात दोघांचे संख्याबळ समसमान झाले. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल चिठ्ठीवर ठरणार असे स्पष्ट असतानाच भाजपचे एक मत अवैध ठरले आणि नशिबावर अवलंबून असलेला हा विजय सेनेने सरळसरळ आपल्या बाजूने झुकवून देत भाजपला मोठा दणका दिला आहे. हा विजय मिळवत पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपला गनिमी कावा यशस्वी केला. पण याबरोबरच त्यांनी भाजपचे खासदार मनोज कोटक आणि महापलिका गटनेते प्रभाकर शिंदे यांना मोठा झटका दिला.

एन प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहल मोरे यांची निवड

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ करिता १७ प्रभाग समित्यांपैकी उर्वरित ०६ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. एस अँड टी प्रभागात भाजपचे १०, शिवसेना ०८, काँग्रेस ०१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ०१ असे संख्याबळ आहे. सेनेच्यावतीने दिपमाला बढे आणि भाजपच्या वतीने जागृती पाटील या निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना समसमान मतदान होणार हे स्पष्ट होते. परंतु भाजपच्या रजनी केणी यांचे एक मत नावापुढील रकान्याच्या बाहेर पर्यंत स्वाक्षरी केल्याने पिठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांचे मत अवैध ठरवले. नियमानुसार सदस्यांनी नावापुढील चौकोनातच स्वाक्षरी करणे अपेक्षित असते. परंतु केणी यांनी स्वाक्षरी केल्यावर दोन रेघा मारल्या त्या बाजूच्या चौकोनात गेल्या. त्यामुळे पिठासीन अधिकारी यांनी त्यांचे मत अवैध ठरवत सेनेच्या बढे यांना विजयी घोषित केले. त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

एस व टी प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपमाला बढे यांची निवड

एम पूर्व-पश्चिम प्रभागात भाजप बिनविरोध

आर/मध्य व आर/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी सेनेच्या सुजाता पाटेकर आणि भाजपच्या आसावरी पाटील यांच्यात चुरस होती. या प्रभागात सेनेची ०९ तर भाजपची ०८ आणि काँग्रेसचे १ असे संख्याबळ आहे. परंतु काँग्रेसने सेनेला मतदान केल्याने पाटेकर यांचा विजय झाला. तर एन प्रभाग समिती अध्यक्ष पदी स्नेहल मोरे विजयी झाल्या. मोरे यांना ०८ तर भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांना ०३ मते मिळाली. ‘एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे महादेव शिवगण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर ‘एम/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.

आर/मध्य व आर/ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष पदी शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांची निवड

‘आर/दक्षिण’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लिना पटेल – देहेरकर या १० मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे एकनाथ (शंकर) हुडांरे यांना १ मते मिळाले. एकूण १३ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०१ सदस्य अनुपस्थि‍त होते, ०१ मत अवैध ठरले. या सर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पि‍ठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उप महापौर अॅड. सुहास वाडकर यांनी काम पाहिले.