घरCORONA UPDATE..तर मुंबई पालिकेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा - कर्मचारी संघटना

..तर मुंबई पालिकेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा – कर्मचारी संघटना

Subscribe

महापालिका कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती करून बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी नोंदवण्याच्या सक्तीमुळे कामगारांमध्ये प्रचंड चीड व्यक्त केली जात असून कामगार संघटनांनीही याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाचे अशा प्रकारचे वर्तन असेल तर आम्हाला नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारच्या निर्णयामुळे महापालिका कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला तरी त्यांची जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील आणि वेळ पडल्यास प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्या वाचून आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला आहे.

महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आणि सोमवारपासून सुरु करण्यात येणारी बायोमेट्रीक हजेरी याबाबतचे परिपत्रक बुधवारी महापालिका प्रशासनाने जारी केले आहे. यासंदर्भात दि म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापालिका प्रशासनाला अशा प्रकारचे परिपत्रक अनिवार्य करून कोरोना विषाणू वाढवण्यास प्रशासन हातभार लावत असल्याचे आरोप केला. जोपर्यंत वाहतुकीची व्यवस्था सुरळीत होत नाही, त्याचप्रमाणे लॉकडाऊन पूर्णपणे रद्द केले जात नाही. याशिवाय बायोमेट्रीक प्रणालीत योग्य त्या सुधारणा केल्या जात नाही, तोपर्यंत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली जावी. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ ते ५० टक्के एवढी आळीपाळीने बंधनकारक करण्यात अशी मागणी युनियनने केली आहे. तरीही या सर्व बाबी नजरेआड करून घेतलेला निर्णय जबरदस्तीने कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास नाईलाजाने आम्हाला आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही असा इशारा युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोमवारपासून मुंबई महापालिकेत पुन्हा बायोमेट्रीक हजेरी!

तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष Adv सुखदेव काशिद आणि सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनीही या परिपत्रकाचा तीव्र निषेध करत त्याला स्थगिती देण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच चर्चेसाठी त्यांनी आयुक्तांकडे वेळेचीही मागणी केली आहे. बायोमेट्रीकसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नसून यामुळे या आजाराचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची भीतीही मजदूर युनियनने व्यक्त केली आहे.

१८५ अभियंत्यांची तात्काळ बदली करा

कोरोनाशी संबंधित कामांमध्ये सध्या १८५ अभियंते सक्रीय असून त्यांना या कामांमधून मुक्त करण्याची मागणी करूनही अद्याप या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यामुळे हे सर्व अभियंते सामुदायिक रजा आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असल्याचं निवेदन बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे १८५ अभियंत्यांच्या जागी बदली कर्मचारी देऊन या अभियंत्यांना त्यांच्या खात्यात परत पाठवण्यात यावे तसेच त्यांना गेल्या ९० दिवसांत देण्यात न आलेल्या साप्ताहिक सुट्या आणि पूरक रजा देण्याची मागणी इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष राजाध्यक्ष यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -