घरमहा @२८८टोल फ्री लाईनद्वारे बोगस डॉक्टरांवर धाडसत्र

टोल फ्री लाईनद्वारे बोगस डॉक्टरांवर धाडसत्र

Subscribe

बोगस डॉक्टरांना अटक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भरारी पथक नेमून देण्यात येणार आहे.

राज्यात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीत डॉक्टर्स असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यात किती खरंच डॉक्टर असतात हा देखील प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय, राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ही पाहायला मिळतोय. त्यामुले, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. यानुसार, लवकरच बोगस डॉक्टरांना अटक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भरारी पथक नेमून देण्यात येणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं की, “ रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ नये यासाठी राज्यात असलेल्या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र भरारी पथक नेमून, त्याचप्रमाणे टोल फ्री लाईन सुरु करून बोगस डॉक्टरांवर धाडसत्र लवकरच सुरू होईल.”

- Advertisement -

ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईत पोलिसांनी धाड टाकून ५ बोगस डॉक्टरांना अटक केली होती. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या ५ बोगस डॉक्टरांच्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुसक्या आवळल्या होत्या. राज्यातील अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर वैद्यकीय पदवी नसताना शहरात दवाखाने थाटून उपचारांच्या नावाखाली बनावट औषधं देतात. यावर चाप बसावा यासाठी राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं की, “ दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चालली आहे. अशा बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी आता सरकारने पुढाकार घेतला आहे ही गोष्ट फार चांगली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र भरारी पथक आणि टोल फ्री लाईन या सरकारच्या निर्णयाचं कौतुक आहे. त्याचप्रमाणे सरकारला यामध्ये महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलद्वारे देखील मदत करण्यात येईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -