सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलीवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक

अंधेरी येथे समाजसेवा शाखेची कारवाई; दोन मॉडेलची सुटका

Mumbai
arrest
प्रातिनिधीक फोटो

सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलीवूडच्या एका कास्टिंग डायरेक्टरलाच मंगळवारी गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. नवीनकुमार प्रेमलाल आर्या असे या आरोपी डायरेक्टरचे नाव असून अटकेनंतर त्याला वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला शिवडीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मॉडेलची सुटका केली असून या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवीनकुमार हा बॉलीवूडमध्ये काम करीत असून तो ओशिवरा परिसरातील हॉटेलमध्ये त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्या संपर्कात मॉडलिंग क्षेत्रात करिअर करणार्‍या काही तरुणी असून या तरुणींना तो ग्राहकांसोबत विविध हॉटेलमध्ये वेश्याव्यवंसायासाठी पाठवितो अशी माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने नवीनकुमारला संपर्क साधून दोन मॉडेल तरुणीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या दोन्ही मॉडेलला घेऊन मंगळवारी नवीनकुमार अंधेरीतील वर्सोवा, सातबंगला, स्प्रिंग लिफ सहकारी सोसायटीच्या कॅफे कॉफी डेमध्ये घेऊन आला होता. यावेळी ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी तरुणींसाठी पैसे घेताना त्याला प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्यासह रामोळे, पाटसुपेख चांदगावकर, महिला शिपाई तावडे यांनी शिताफीने अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी दोन मॉडेल तरुणीची सुटका केली आहे. त्यातील एका तरुणीने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात ज्युनिअर कलाकार म्हणून काम केले आहे तर दुसरी तरुणी मेकअप कलाकार म्हणून काम करीत होती. ही तरुणी दिल्लीतील मुख्य दलाल आश्विनीकुमार याच्या संपर्कात होती. त्याच्याच सांगण्यावरुन ती मंगळवारी अंधेरी येथे गेली होती. या मॉडेल तरुणींना एका रात्रीसाठी वेश्यागमनाचा मोबदला म्हणून साठ हजार रुपये दिले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अटकेनंतर नवीनकुमारला वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यांत अजय शर्मा आणि विजय या दोघांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे आश्विनीकुमारच्या अटकेसाठी लवकरच पोलीस पथक दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here