घातक शस्त्रांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक

रवी पुजारीच्या हत्येची योजना बनविल्याचे तपासात उघड

Mumbai
Representative photo
दोघा जणांना अटक, साकीनाका परिसरात खळबळ

घातक शस्त्रांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना मंगळवारी गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सादीक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमनी अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तुल आणि 29 जिवंत काडतुसे जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. यातील सादिक हा रवी पुजारीचा खास सहकारी होता, मात्र एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर रवी पुजारी त्याचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू झाला होता. त्याच्या हत्येची योजनाच सादिकने बनविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने सोमवार 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार देशी पिस्तुल जप्त

सांताक्रुज येथील लिकिंग रोडवरील एका खाजगी शाळेजवळ रवी पुजारी टोळीचे काही गुंड घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी सायंकाळी तिथे सादिक बंगाली आणि धवल देवरमनी हे दोघेही आले होते. यातील सादिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्या दोघांनाही पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना चार देशी बनावटीचे पिस्तुल आणि 29 जिवंत काडतुसे सापडले. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यात ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

स्वत:ची टोळी बनवण्याच्या तयारीत

सादिक हा रवी पुजारीचा खास सहकारी म्हणून परिचित होता. त्याने रवी पुजारीच्या आदेशावरुन मुंबई, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा आणि पुणे येथे अनेक बड्या व्यक्तींची हत्या तसेच काहींवर जीवघेणा हल्ला केला होता. 2006 साली त्याने प्रसिद्ध सिनेनिर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार केला होता, त्यानंतर नवी मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. 2015 साली लोणावळा येथे दुहेरी हत्येसह तीन हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचे रवी पुजारीशी क्षुल्लक कारणावरुन भाांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने रवी पुजारीची टोळी सोडली होती, अलीकडेच तो स्वत:ची टोळी बनविण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याला धवलने घातक शस्त्रे पुरविले होते.

भडकवायचे होते गँगवार

धवल हा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून चोरट्या मार्गाने घातक शस्त्रे आणून सादिकला देत होता. त्याला रवी पुजारीसह प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांवर गोळीबार करुन शहरात पुन्हा गँगवार भडकवायचे होते. त्याने दोन व्यक्तींच्या हत्येची सुपारी घेतल्याचे बोलले जाते भांडणानंतर त्याला रवी पुजारीविरुद्ध प्रचंड राग होता. याच रागातून त्याने रवी पुजारीच्या हत्येची योजना बनविली होती. मात्र त्यापूर्वीच त्याला धवलसोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here