घरमुंबईसावरकरप्रेमींनी राहुल गांधींच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळले

सावरकरप्रेमींनी राहुल गांधींच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळले

Subscribe

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या वादग्रस्त वाक्यामुळे चर्चेत आले आहेत. देशात चालू असलेल्या बलात्कार प्रकरणामुळे ते देशाला ‘रेप इन इंडिया’ असे म्हणाले होते. त्यामुळे वक्तव्यावरून भाजपने त्यांना माफी मागण्याची मागणी केली. मात्र राहुल यांनी भाजपाची ही मागणी धुडकावून लावली. त्यांनी भाजपला असे सुनावले की, ‘माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीच बोलो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही.’ याच पार्श्वभूमीवर सावरकरप्रेमींनी आज राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले.

राहुल गांधी मुर्दाबाद, अशा दिल्या घोषणा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या सावरकरप्रेमी नागरिकांचा मोठा जनक्षोभ आज सकाळी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाबाहेर दिसून आला. संतप्त जमावाने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्यांच्या निषेधाचा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. अखिल भारतीय हिंदुमहासभा, राष्ट्रभक्ती समिती, सेवा संकल्प प्रतिष्ठान, श्री शिवनाथ शिक्षण संस्था तसेच अनेक संघटना आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो, राहुल गांधी मुर्दाबाद अशा अनेक घोषणा यावेळी देत निषेध केल्या गेला.

- Advertisement -

सावकरांचे नाव घेण्याची लायकी नाही

आंदोलनात सहभागी झालेल्या अखिल भारतीय हिंदुमहासभेच्या मुंबई उपाध्यक्षा आणि राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतिगीता महाबळ यांनी म्हटले की, राहुल गांधी सात जन्मात सावरकर होऊ शकत नाही. त्यासाठी शौर्य, धैर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा हे पराकोटीचे गुण लागतात. हे त्यांच्यात अजिबात नाही. सावरकरांनी ११ वर्षे काथ्याकूट, कोलू ओढले. राहुल यांनी किमान ११ दिवस तरी हे काम करून दाखवावे. सावरकरांचे नाव घेण्याचीही किंवा त्यांच्या जोड्याजवळ देखील उभे राहण्याची लायकी राहुल गांधींची नाही. त्यामुळे त्यांनी असे बोलण्याचे धाडस करू नये, असे आव्हानदेखील त्यांनी केले.

नक्की वाचा – ‘माफी मागायला मी सावरकर नाही.’

- Advertisement -

राहुल गांधी यांनी देश सोडून जावे

राहुल गांधी यांनी आता माफी मागून भागणार नाही तर त्यांनी एक तर राजकारण सोडून द्यावे किंवा सरळ देश सोडून आपल्या मातृभूमीत जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी विजय सुर्वे यांनी दिली. काँग्रेसवालेच राहुल गांधी यांना संपवत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रपुरुषांचा अपमान केल्याबद्दल हद्दपार करण्याची शिक्षा द्यावी

सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक सुहास नार्वेकर यांनी राहुल गांधींनी दुसराच विषय भरकटवून तो सावरकरांपर्यंत आणायला नको होते. कारण त्याचा काहीही संबंध नव्हता. तरीदेखील जाणीवपूर्वक त्यांनी हे कृत्य केले आहे, त्याबद्दल त्यांना माफी नाही. उलट राष्ट्रपुरुषांचा अपमान केल्याबद्दल हद्दपार करण्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी, असे मत व्यक्त केले.

इंदिरा गांधी यांची सावरकरभक्ती विचारात घेतली पाहिजे

अखिल भारतीय हिंदुमहासभेचे प्रवक्ते प्रा. महेश कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या जाती निर्मूलन, भाषाशुद्धी तसेच हिंदुधर्म वाढीच्या कार्याच्या नखाची सरदेखील राहुल गांधी यांना येणार नाही. त्यामुळे त्यांनी अशा व्यक्तीबद्दल बोलू नये आणि बोलण्याआधी आपली आजी इंदिरा गांधी यांची सावरकरभक्ती देखील विचारात घेतली पाहिजे. त्यांना सावरकरांबद्दल आदर होता, त्यांनी टपाल तिकीट काढले होते. तसेच सावरकर स्मारकाला वैयक्तिक खात्यातून देणगी देखील दिली होती, हेही त्यांनी सांगितले.

डॉ. धनंजय कुलकर्णी, अंदमानच्या महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी विष्णू गवळी, शिवसेनेचे महेश खैरनार, मंगेश फणसेकर, उमेश गुरव, विजय भाटकर यांनीदेखील या आंदोलनात भाग घेऊन आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.


हेही वाचा – म्हणून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -