कंगणा रनौतच्या अडचणी वाढल्या, विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव!

kangana ranaut

अभिनेत्री कंगणा रनौतने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या विधानांमुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. ‘मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असं विधान करून कंगणाने शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची नाराजी ओढवून घेतली होती. या पार्श्वभूमीवर कंगणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मोठं ट्वीटर वॉर देखील रंगलं होतं. त्यानंतर कंगणानेही व्हिडिओ ट्वीट करून ‘मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. काय करायचं ते करा’, असं म्हणत थेट शिवसेनेला शिंगावर घेतलं. या पार्श्वभूमीवर मुंबईबद्दल केलेल्या विधानाबद्दल कंगणा रनौतविरोधात विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

कंगणाने म्हटलं होतं, ‘कोकेन ले ले’!

हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना भाई जगताप यांनी आपली भूमिका देखील मांडली. ‘कलाकार हे देशाचं वैभव असतात असा आमचा कालपर्यंत समज होता. मुंबईबद्दल जगभरात चांगली प्रतिमा आहे. मुंबईला राज्याची राजधानी बनवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. पण कंगणा त्याच मुंबईबद्दल विधान करत आहे. २०१६मध्ये कंगणा अध्ययन सुमनला सांगत होती की ‘कोकेन ले ले’. अशी नशेडू महिला मुंबईच्या बाबतीत बोलते म्हणून मी तिच्याविरुद्ध हक्कभंग आणला आहे’, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. तसेच, ‘कंगणाबद्दल बोलल्यावर कुणाला का मिरच्या लागतात ते कळत नाही’, असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनदिवसीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव समिती उपस्थित नसल्यामुळे या प्रस्तावावर खुद्द सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मीच निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता कंगणाबद्दलच्या प्रस्तावावर सभापती काय निर्णय घेणार, यावर कंगणाच्या पुढच्या अडचणी अवलंबून असणार आहेत.

याशिवाय, यावेळी विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेत देखील पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. दरम्यान, कंगणाप्रमाणेच अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर देखील सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेच निर्णय घेणार आहेत.