घरमुंबईविकासक-पालिकेत विसंवाद, 10 महिन्यांपासून दवाखाना बंद

विकासक-पालिकेत विसंवाद, 10 महिन्यांपासून दवाखाना बंद

Subscribe

लोअर परेल येथील हशम इमारतीच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार इमारतीमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. परंतु पालिकेच्या दवाखान्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याबाबत महापालिका व विकासकामध्ये एकमत होत नाही.

लोअर परेल येथील हशम इमारतीच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार इमारतीमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. परंतु पालिकेच्या दवाखान्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याबाबत महापालिका व विकासकामध्ये एकमत होत नाही. त्यामुळे 10 महिन्यांपासून दवाखाना बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी परिसरातील गरीबांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

लोअर परेल येथील मच्छिमार्केटमधील हशम बिल्डिंगमध्ये पालिकेचा दवाखाना आहे. मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. त्यानुसार खासगी विकासकामार्फत हा विकास करण्यात येणार असल्याने विकासकाने रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केली. पण याच इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पालिकेचा दवाखाना 10 महिने उलटले तरी पालिका व विकासकाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. दवाखाना नसल्याने परिसरातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला अशा आजारांसाठी खासगी डॉक्टरकडे जावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दवाखान्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आरोग्य खात्याचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकार्‍यांच्या अनेक बैठका झाल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे नागरिक सांगत आहेत.

- Advertisement -

इमारतीमधील पालिकेच्या दवाखान्याला पर्यायी जागा देण्याबाबत व कराराबाबत आम्ही विकासकाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु विकासकाकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. तसेच विकासकासोबत करारही झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या ग दक्षिण विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र गोल्हार यांनी दिली. मात्र करार करण्यासंदर्भात आम्हीच पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याला पालिकेने प्रतिसाद दिला नसल्याचे विकासकाकडून सांगण्यात आले. पालिकेने आम्हाला पर्यायी जागेऐवजी इमारतीच्या जवळच कंटेनरची व्यवस्था करावी असे सांगितले होते. त्यानुसार आम्ही त्यांना आठ लाखांचे कंटेनर दिले. त्यातील त्रुटीही आम्ही दूर केल्या. मात्र आता पालिका पर्यायी जागा मागत आहेत. पालिकेच्या धरसोड वृत्तीमुळेच अडचणी येत असल्याची माहिती विकासक सर्व्हेश इंटरप्रायझेसचे सुपरवायझर स्वप्नील खेडेकर यांनी सांगितले.

विकासकाकडून इमारत तोडण्यात आल्याने उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी दवाखाना बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी जागा देण्यासंदर्भात आम्ही विकासकाकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच कराराची प्रक्रिया पूर्ण होईल.– डॉ. देवेद्र गोल्हार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ग दक्षिण विभाग.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -